विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने यंदाच्या हंगामात आश्वासक सुरुवात केली आहे. गेल्या काही हंगामांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असणारा आणि सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनलेल्या RCB ने यंदा थेट प्ले-ऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. ७ सामन्यांत ५ विजयांसह RCB चा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आज विराटसेनेसमोर गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचं आव्हान आहे. मात्र या सामन्याआधी पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने विराट आणि एबी डिव्हीलियर्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

एका खासगी ब्रँडच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये राहुल आणि विराट हे दोन्ही कर्णधार गप्पा मारत होते. यावेळी कोहलनी राहुलला टी-२० क्रिकेटमध्ये कोणता एक बदल बघायला आवडेल असा प्रश्न विचारला. ज्यावर लोकेश राहुलनेही तितकंच गमतीशीर उत्तर दिलं. “मी आयपीएलला अशी विनंती करेन की पुढच्या वर्षापासून तू आणि डिव्हीलियर्सवर IPL मध्ये बंदी घालण्यात यावी. ज्यावेळी तुम्ही कारकिर्दीत काही हजार धावांचा टप्पा गाठता त्यावेळी असं वाटतं की आता बस्स, किती खेळाल?? ५ हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता दुसऱ्यांनाही संधी मिळायला हवी.”

अवश्य वाचा – IPL 2020 : …तसं करण्याआधी दोनदा विचार कर, विराटचा राहुलला इशारा

IPL च्या तेराव्या हंगामात लागोपाठ पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे. याआधी झालेल्या सामन्यात राहुलने RCB विरोधात शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे पंजाबचा संघ यंदा अशी कामगिरी पुन्हा करु शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराट कोहलीची अजब मागणी, कर्णधारांना वाईड बॉलसाठी DRS चा पर्याय हवा!