चेन्नईविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरू संघाने २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या मधल्या टप्प्यात (६ ते १५ षटके) चेन्नईच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध कामगिरी करत बंगळुरूच्या फटकेबाजीला आळा घातला. विराट-डीव्हिलियर्स जोडीने ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना मराठमोळा ऋतुराज गायकवाड याने दमदार खेळी केली. आपल्या पहिल्या २ IPL सामन्यात शून्यावर माघारी परतण्याची नामुष्की ओढवलेल्या ऋतुराजने शानदार अर्धशतक ठोकलं. त्याने ४२ चेंडूत ही कामगिरी केली आणि आपली निवड सार्थ ठरवली.

त्याआधी, सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेली फिंच-पडीकल जोडी जपून फलंदाजीला सुरूवात केली. पण फिंच १५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडीकल २२ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी बराच खेळ खेळपट्टीवर तळ ठोकला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजी करून दिली नाही. ६८ चेंडूत त्यांना ८२ धावांचीच भागीदारी करता आली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं पण मोठे फटके खेळताना डीव्हिलियर्स ३९ धावांवर तर विराट ५० धावांवर माघारी परतला. मोईन अली आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात बाद झाला. त्यामुळे बंगळुरूला २० षटकांत केवळ १४५ धावाच करता आल्या.