महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPLच्या इतिहासात पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण यंदा त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करणं शक्य झालं नाही. मधल्या काळात धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो कदाचित स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. पण, कर्णधाराने कधीही पळ काढायचा नसतो असं सांगत धोनीने त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. अशा परिस्थितीत CSKचे CEO कासी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल महत्त्वाची अपडेट दिली.

“IPLमध्ये धोनीने संघासाठी ३ विजेतेपजदं मिळवून दिली आहेत. बाद फेरीसाठी पात्र न ठरण्याची ही आमच्या संघाची पहिलीच वेळ आहे. आमच्या संघाएवढं सातत्य आजपर्यंत इतर कोणत्याही संघाने दाखवलेलं नाही. एका खराब वर्षामुळे आम्ही सरसकट बदल करायला हवा असं अजिबात नाही. पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी नक्की खेळेल आणि मला खात्री आहे की तो संघाचं नेतृत्व करत असेल. IPL 2021मध्ये CSKचा कर्णधार धोनीच असेल”, असे विश्वनाथन टीओआयशी बोलताना म्हणाले.

“यंदाच्या हंगामात आम्हाला आमच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. काही सामने आम्ही जिंकायला हवे होते, पण ते सामने आम्ही गमावले. अशा अटीतटीच्या सामन्यांचा आम्हाला फटका बसला. सुरेश रैना, हरभजन सिंग या दोघांनी घेतलेली माघार आणि स्पर्धेच्या आधी करोनाचा CSKच्या गोटात झालेला शिरकाव यामुळे संघाचं संतुलन काहीसं बिघडलं”, अशी कबूली त्यांनी दिली.