IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून टाकले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. सामन्यात लोकेश राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा कुटल्या. राहुलच्या शतकाआधी तब्बल दोन वेळा विराटकडून त्याचा झेल सुटला. त्यामुळे विराटवर टीका झालीच, पण त्याचसोबत मुंबईकर अजित आगरकरने एका वेगळ्या मुद्द्यावरून विराटवर टीकास्त्र सोडलं.

 

“पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराटने २०वे षटक शिवम दुबेला टाकायला दिलं. मला मान्य आहे की त्याने सामन्यात २ चांगली षटके टाकली होती. पण जेव्हा तुम्ही शेवटच्या षटकाचा विचार करता आणि समोर शतक ठोकलेला खेळपट्टीवर स्थिरावलेला फलंदाज असतो तेव्हा तुम्ही नियमित वेगवान गोलंदाजालाच संधी देणं योग्य ठरतं. कारण टी 20 हा असा प्रकार आहे ज्यात दोन चेंडूमध्येही सामना फिरू शकतो” असं अजित आगरकर इएसपीएनक्रीकइन्फोशी बोलताना म्हणाला.

“आव्हानाचा पाठलाग करतानादेखील RCBची अवस्था वाईट झाली कारण त्यांनी झटपट बळी गमावले. सध्या त्यांच्याकडे फिंच आहे त्यामुळे विराटने सलामीला न येणं ठीक आहे पण विराटने तिसऱ्या क्रमांकापेक्षा खाली फलंदाजी करणं चुकीचंच आहे. खरं तर आव्हान कठीण असतं तेव्हा विराट स्वत: पुढे येऊन त्या आव्हानाचा सामना करतो. पण त्या दिवशी विराट तिसऱ्या क्रमांकालाही फलंदाजीस उतरला नाही ते पाहून मला आश्चर्यच वाटलं. विराटचा तो निर्णय पूर्णपणे चूकच होता”, असं मतदेखील आगरकरने मांडलं.

विराटमुळे राहुलला दोन वेळा जीवनदान

विराट कोहलीने राहुलचा ८३ आणि ८९ या धावसंख्येवर असताना दोन वेळा सीमारेषेजवळ झेल सोडला. त्यानंतर राहुलने तुफान फटकेबाजी करत पुढील १० चेंडूत ४३ धावा कुटल्या. या साऱ्या प्रकाराबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, “माझ्या चुकीमुळे आमचं आव्हान ३५ ते ४० धावांनी वाढलं. नाहीतर आम्ही पंजाबला १८० पर्यंत रोखू शकलो असतो आणि मग आमच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या चेंडूपासूनच आमच्यावर दडपण वाढलं नसतं.”