भारतीय क्रिकेटचा गब्बर फलंदाज शिखर धवन याने चेन्नईविरूद्धच्या सामन्यात तडाखेबाज शतक ठोकलं. ५७ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने धवनने पहिलं IPL शतक ठोकलं. सलामीवीर पृथ्वी शॉ, मुंबईकर अजिंक्य रहाणे, कर्णधार श्रेयस अय्यर आणि धडाकेबाज फलंदाज मार्कस स्टॉयनीस हे चौघे झटपट माघारी परतले, पण शिखर धवनने मात्र खेळपट्टीवर तळ ठोकत धमाकेदार शतक ठोकलं. चेन्नईच्या दीपक चहर, धोनी आणि रायडूकडून धवनचा १-१ झेल सुटला. त्या जीवनदानांचा पुरेपूर वापर करत शिखर धवनने दमदार खेळी केली. धवनचे हे IPLमधील पहिले शतक ठरले. या आधी त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ९७ होती.

असा रंगला सामना

१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही झटपट माघारी परतल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने ६८ धावांची भागीदारी केली. दरम्यानच्या काळात शिखरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. पण श्रेयस अय्यर मोठा फटका खेळताना बाद झाला. पाठोपाठ मार्कस स्टॉयनीस आणि अलेक्स कॅरीही स्वस्तात बाद झाले. शिखरने आपलं पहिलं शतक साजरं केलं. त्याला अक्षर पटेलने सुरेख साथ देत संघाचा विजय साकारला.

त्याआधी, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने १७९ धावांचा पल्ला गाठला. सलामीवीर सॅम करन स्वस्तात बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. वॉटसन ३६ धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने ५८ धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (४५*) आणि जाडेजा (३३*) यांनी संघाला १७९ चा आकडा गाठून दिला.