इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिलाच सामना आहे. या सामन्यापूर्वी हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला खास व्यक्तीकडून शुभेच्छा आल्या आहे.

डेव्हिड वॉर्नरला बंगळुरुविरोधातील सामन्यापूर्वी पत्नी कँडी आणि मुलांकडून शुभेच्छा आल्या आहेत. डेविड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर कुटुंबाकडून आलेल्या शुभेच्छाही व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये पत्नी आणि मुलं वॉर्नरला पहिल्या सामन्यापूर्वी व्हिडीओ मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ वॉर्नरने शेअर करत पाठींबा दिल्याबद्दल धन्यवाद म्हणून मेसेज पोस्ट केला आहे. पहिल्या सामन्याआधी मला अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. मात्र, पत्नी आणि मुलांकडून आलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास आहेत, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलेय.

सनरायजर्स हैदराबादची भिस्त नेहमीप्रमाणे कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर आहे. वॉर्नरने तीन वेळा ‘आयपीएल’मध्ये ‘ऑरेंज कॅप’ (हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) पुरस्कार पटकावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने २०१६मध्ये ‘आयपीएल’ जिंकली आहे. जॉनी बेअरस्टोसोबत वॉर्नर सलामीला येत असल्याने हैदराबादला चांगली सुरुवात अपेक्षित आहे. बेअरस्टो आणि वॉर्नर यांनी गेल्या हंगामात बेंगळूरुविरुद्धच केलेली १८५ धावांची सलामी (१६.२ षटकांत) ही ‘आयपीएल’च्या इतिहासात सर्वोत्तम ठरली होती.