जगभरात आणि भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. पण क्रिकेटचे सामने आणि ते देखील प्रेक्षकांविना?? हे समीकरणं कसं बरं जुळवायचं?? यासाठी उपाय काढण्यात आला तो म्हणजे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या…चिअरलिडर्सच्या रेकॉर्डेड डान्स मूव्ह्ज यांचा… आयपीएलच्या सामन्या दरम्यान असणारे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या या मुंबईच्या स्टुडिओमध्ये तयार करण्यात आले आहेत. मुंबईच्या स्टुडिओमध्ये इंजिनिअरने तयार केलेल्या ‘साउंड बँक’ मुळे आपल्याला सामना पाहाताना प्रेक्षकांचे आवाज, टाळ्या-शिट्ट्या ऐकू येतात. यासाठी आयपीएल ब्रॉडकॉस्ट स्टार इंडियानं आयपीएलपूर्वीच तीन महिने तयारी केली आहे. वानखेडे, चिन्नस्वॉमी आणि चेपॉकसारख्या भारतातील मैदानावरील आवाजाचं मिक्सिंग तयार करण्यात आलं आहे.

स्टार इंडियाचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेय की, ‘आयपीएल सुरु होण्यापूर्वी २०१८ पासून झालेल्या आयपीएलच्या १०० सामन्याचा अभ्यास केला. प्रत्येक सामन्यासाठी आणि खेळाडूसाठी आवाजाचा (साउंड) अभ्यास करण्यात आला. जसं की, चेन्नई आणि मुंबई यांच्या सामन्यातील आवाजाचा डेसीबल पंजाब आणि दिल्लीच्या सामन्यापेक्षा खूप वेगळा असेल. ‘

गुप्ता म्हणाले की, ‘ आम्ही प्रत्येक खेळाडू आणि संघासाठी वेगवेगळ्या आवजाची निवड केली. ज्यावेळी धोनी, रोहित शर्मा किंवा विराट कोहली षटकार मारतात तेव्हा नवख्या किंवा युवा खेळाडूपेक्षा चिअर करणारा आवाज वेगळा असेल. ज्यावेळी धोनी षटकार मारतो तेव्हा चेरॉक स्टेडिअममधील टाळ्यांचा आवाज असेल. विराट आणि रोहित शर्मासाठी खास आवाज असेल. एबी डिव्हिलिअर्ससाठी चिन्नास्वामी स्टेडिअमचा आवाज असेल. तर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी कोटलामधून ‘श्रेयस-श्रेयस’ आवाज घुमेल. या सर्व आवाजांना स्टुडिओमध्येच डब करण्यात आलं आहे.’

‘स्टूडियो आम्ही साउंड बँक तयार केली आहे. वास्तविक गेम साउंडचा वापर करु शकत नाही, कारण यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो, जसे की आतिशबाजी, चीयरलीडर्स आणि स्टेडियममध्ये वाजणारी गाणी. वापरल्या जाणाऱ्या आवाजाचे अनेक लेअर आहेत. स्टेडियम एंबियेंसशिवाय षटकार आणि चौकारासाठी वेगळे आवाज आहेत. या आवाजासाठी जगभरातून फोन येत असून अन्य लीगचे आयोजकी आमच्या संपर्कात आहे. सामन्या दरम्यानच्या बॅकग्राउंड स्कोरबद्दल जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक असल्याचं स्टार इंडियाचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्ता म्हणाले. ‘