बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यात जोस बटलर आणि बेन स्टोक्स ही जोडी सलामीला आली होती आणि रॉबिन उथप्पाला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. या मुद्द्यावरून राजस्थानच्या संघाला अनेकांनी सल्ले दिले होते. नाणेफेकीच्या वेळीदेखील स्मिथने स्टोक्स सलामीलाच येणार असं स्पष्ट केलं. त्यामुळे बटलर-स्टोक्स जोडीच सलामीवीर म्हणून कायम राहणार असं साऱ्यांना वाटलं. पण सामना सुरू झाल्यावर उथप्पासोबत स्टोक्सला सलामीला पाठवण्यात आलं.

राजस्थानचा हा नवा डाव त्यांना चांगलाच फळला. स्टोक्स आणि उथप्पा जोडीने सुरूवातीपासूनच दमदार फटकेबाजी केली. धावा देण्याच्या बाबतीत सर्वात कंजुष समजल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरचा उथप्पाने समाचार घेतला. सुंदरचं पहिलं षटक त्याने शांतपणे खेळून काढलं, पण त्याच्या दुसऱ्या षटकात उथप्पाला सूर गवसला. त्याच्या एका षटकात ४ धडाकेबाज चौकार लगावत उथप्पाने सलामीला येण्याचा निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं.

उथप्पाचे ४ चौकार-

त्यानंतर उथप्पाने दमदार कामगिरी केली. राजस्थानच्या संघाला ६व्या षटकात अर्धशतक गाठून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. उथप्पाने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण २२ चेंडूत ४१ धावा कुटल्या. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.