युएईत सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा थरार सुरु आहे. प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत रंगतो आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातली सुरुवात फारशी आश्वासक झालेली नाही. ३ सामन्यांमध्ये मुंबईला दोन पराभव आणि एक विजय मिळाला आहे. परंतू प्रत्येक सामन्यानंतर मुंबईचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. यंदा मुंबई इंडियन्सने बीडच्या दिग्वीजय देशमुखला आपल्या संघात स्थान दिलंय. तेराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबईने दिग्वीजयवर २० लाखांची बोली लावली होती.

स्थानिक क्रिकेटमध्ये दिग्वीजय महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतो. आयपीएलमध्ये त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नसली तरीही तो तज्ज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचा सराव करतो आहे. मुंबई इंडियन्सचा Director of Cricket Operations झहीरने युएईत सरावादरम्यान दिग्वीजयशी मराठीत बोलून त्याला गोलंदाजीच्या काही टिप्स दिल्या. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे.

झहीर खान हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा रहिवासी…त्यामुळे झहीरचं मराठी हे उत्तम आहे. नेट्समध्ये दिग्वीजय करत असलेली गोलंदाजी पाहून त्याच्यात सुधारणा होत असल्याची पावतीही झहीरने मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडला दिली. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स दिग्वीजयला संघात स्थान देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.