इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर कडाडून टीका केली आहे. धोनीच्या संघनिवडीबाबत श्रीकांत यांनी प्रश्न उपस्थित केला असून केदार जाधव आणि पीयूष चावला यांना संघात स्थान देण्याबाबतही त्यांनी नाराजीदर्शवली.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईला मंगळवारी राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून धूळ चारली. या लढतीत जाधव मधल्या फळीत छाप पाडण्यात पुन्हा अपयशी ठरला, तर अनुभवी फिरकीपटू चावलासुद्धा लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही.

‘‘धोनीच्या मताशी मी पूर्णपणे असहमत आहे. तो नेहमीच प्रक्रियेविषयी बोलत असतो. परंतु मुळात त्याची संघनिवडीची प्रक्रियाच चुकत आहे. जगदीशनमध्ये धोनीला काही विशेष आढळून आले नाही, तर मग जाधवमध्ये असे वेगळे काय आहे? त्याशिवाय शर्मा किमान धावा रोखण्याचे काम चोखपणे करतो, परंतु चावलाला तर तेसुद्धा जमत नाही. बळी मिळवणे दूरच, तो फक्त पाचव्या गोलंदाजाची भूमिका बजावताना दिसत आहे. धोनी एक महान कर्णधार आहे, परंतु त्याच्या या संघनिवडीमागील कारण मला अनाकलनीय आहे,’’ असे श्रीकांत म्हणाले. चेन्नईचे १० सामन्यांतून सहा गुण झाले असून बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना पुढील सर्व सामने जिंकण्याबरोबर अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

युवांची कामगिरी निराशाजनक!

संघातील युवा खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे खेळ केला नाही, त्यामुळे अनुभवी खेळाडूंना स्थान द्यावे लागले, असे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला. तर बाद फेरीच्या आशा धूसर झाल्या असल्या तरी आम्ही प्रयोग करणे थांबवणार नसून उर्वरित लढतींमध्ये युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्यात येईल, असे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.