News Flash

Video : मुंबईच्या सामन्यावरही करोनाचं सावट?; जाणून घ्या बायो-बबल हे प्रकरण आहे तरी काय?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यावरही करोनाचं सावट

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

भारतामध्ये बायो-बबलच्या सुरक्षेमध्ये सुरु असणाऱ्या आयपीएलला सोमवारी मोठा झटका बसलाय. आयपीएलच्या चौदाव्या हंगामावरही करोनाचं सावट गडद झालं आहे. कोलकाताच्या संघामधील दोन खेळाडूंना लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघातील तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणारा बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना पुढे ढकलण्यात आलाय. मात्र अजूनही करोनाच्या या संकटासंदर्भातील संभ्रम दूर झालेला नाही. त्यामुळेच आज होणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यावरही करोनाचं सावट कायम आहे. बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामान्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मात्र हा बायो-बबल प्रकार काय असतो, त्याचे नियम काय असतात?, त्यात करोनाचे विषाणू नसतात का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सध्या पडले आहेत. या प्रश्नांवर व्हिडीओच्या माध्यमातून टाकलेली ही नजर…

मुंबई उतरणार सातत्य कायम राखण्याच्या इराद्याने…

विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सने मागील दोन सामने जिंकून पुन्हा एकदा लय प्राप्त केली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मंगळवारी होणाऱ्या लढतीत तळाच्या सनरायजर्स हैदराबादला नमवून विजयी कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ मैदानात उतरेल.

मुंबईचे पारडे जड…

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने सात सामन्यांत चार विजय मिळवले असून गेल्या लढतीत किरॉन पोलार्डच्या कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जवर सरशी साधल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे गुणतालिकेत आठव्या स्थानी असणाऱ्या हैदराबादला आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकता आल्याने बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सात लढतींपैकी त्यांना किमान सहा सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्याशिवाय उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील लढतीत मुंबईने हैदराबादवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही मुंबईचेच पारडे जड मानले जात आहे.

वॉर्नर किंवा रॉयला संधी?

नूतन कर्णधार केन विल्यम्सन राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजी आणि नेतृत्व अशा दोन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरला. हैदराबादच्या फलंदाजीतील त्रुटी सर्वाना ठाऊक असल्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर किंवा इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय यांना सलामीला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. भुवनेश्वर कुमार आणि रशिद खान यांच्या षटकांचा योग्यरीतीने वापर करणे हैदराबादसाठी महत्त्वाचे आहे. खलिल अहमद, संदीप शर्मा आणि विजय शंकर सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे हैदराबादच्या संघात अनेक बदल अपेक्षित आहेत.

मुंबई इंडियन्स :  मधल्या फळीला सूर गवसला

मुंबईला सुरुवातीच्या काही सामन्यांत मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश भेडसावत होते. परंतु पोलार्डसह हार्दिक आणि कृणाल पंडय़ा यांनाही सूर गवसल्याचे गेल्या लढतीत दिसून झाले. त्यामुळे मुंबईचा संघ अधिक धोकादायक ठरू शकतो. रोहित (२५० धावा) आणि क्विंटन डीकॉक (१५५) यांच्याकडून मुंबईला आणखी एका दमदार सलामीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांची अनुभवी जोडी गेल्या सामन्यातील सुमार कामगिरीला विसरून झोकात पुनरागमन करतील, अशी आशा आहे. मुंबईसाठी आतापर्यंत सर्वाधिक ११ बळी मिळवणाऱ्या राहुल चहरवर फिरकीची मदार असेल.

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 9:42 am

Web Title: ipl 2021 and corona mumbai indians vs sunrisers hyderabad and bio bubble issue scsg 91
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL 2021 :विजयी सातत्य राखण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक
2 IPL २०२१ : दिल्लीतील सामने थांबवावेत, उच्च न्यायालयात याचिका दाखल
3 पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला!
Just Now!
X