अंगात भरलेली अपरिमित ऊर्जा सांभाळत त्या मुलाने सामानाची बांधाबांध करून आपल्या घराकडे प्रवास सुरू केला आहे. त्याचे मन आणि शरीर ज्या ऊर्जेने भारून गेले आहे ती ऊर्जा त्याला ओळखीची आहे. नवीन नाही. दरवर्षी परक्या ठिकाणी घालवलेले सुटीचे दिवस संपवून घराकडे परतताना त्याला या ऊर्जेचा अनुभव येत गेला आहे.

विमानतळावर सुरक्षारक्षक त्याच्या अंगावरून संपूर्ण हात फिरवून या ऊर्जेचा अदमास घेत असावेत असे त्याला वाटत राहते. तो तरंगतो आहे. त्याला नवी त्वचा आली आहे. ती त्वचा टोचते आहे. शरीरावर अजून नीट बसलेली नाही. पण त्याच्यातले जनावर खूप ताजेतवाने झाले आहे. तो नम्र, शांत आणि समजूतदार होऊ  घातला आहे. या सुटीत भेटलेली ओळखीची आणि अनोळखी माणसे त्याच्या डोळ्यांसमोरून सरकून जात आहेत. तो या देशात पुन्हाशरीरावर अजून नीट बसलेली नाही. पण त्याच्यातले जनावर खूप ताजेतवाने झाले आहे. आला नाही तर कदाचित या कोणत्याच माणसांशी त्याची परत भेट होणार नाही.

त्याच्या खांद्यावरील पिशवीतील नवी पुस्तके.. त्याने पायात घातलेले नवे बूट.. त्याच्या सोबत चालणारी जुन्या वाईनची एक नवी बाटली.. तो व्यवस्थित वेळेवर सगळीकडे जाणारा मुलगा असला तरी विमान पकडायचे असले की कोणत्यातरी भीतीने तो गरजेपेक्षा जास्त आधी विमानतळावर येऊन पोहोचतो. आणि मग आधी खूप घाई व नंतर निवांत वाट पाहायची अवस्था त्याच्या वाटय़ाला नेहमी येते. अशावेळी तो अजून दोन-तीन पुस्तके खरेदी करतो; जी खरे तर घरी ऑनलाइन सहजपणे मागवता आली असती.

त्याला इथे विमानतळावर सोडायला आलेले किंवा मुंबईत पोचल्यावर न्यायला येणारे कुणीही नाही असा तो मुलगा आहे. असे अनेकजण असतात- त्यांच्यापैकी आपण एक आहोत, असे तो स्वत:ला सांगतो आहे. कारण कॉफी शॉपमध्ये त्याच्या शेजारी बसलेली मुलगी एका पुरुषाला ती किती वाजता पोचणार आहे, तिने त्याच्यासाठी काय घेतले आहे, त्याने तिला कसे आणि कुठे न्यायला यायचे आहे, आणि ती त्याला भेटल्यावर कशा गोड पाप्या देणार आहे, हे सांगते आहे. परदेशातील विमानतळावर मातृभाषेत बोलणारे फक्त आपणच असतो असे ज्या जीवांना वाटते, त्यांच्यापैकी ती एक आहे. तो तिच्या अगदी शेजारीच बसून तिचे सगळे बोलणे ऐकत बसला आहे. तिच्या पिशवीत गोडगट्ट  चॉकलेटे आहेत असे तिच्या बोलण्यावरून त्याला कळते. हल्ली भारतात आया आणि प्रेयस्या सर्व पुरुषांशी एकसारख्याच वागतात आणि बोलतात, त्यामुळे ती मुलगी प्रियकराशी बोलते आहे की तिच्या मुलाशी, हे त्याला पूर्णपणे लक्षात येत नाही. ती नोकरीसाठी इथे आलेली आहे. तिला घरच्या जेवणाची फार म्हणजे फारच आठवण येत आहे. आपल्याला असे कुणी न्यायला-आणायला विमानाच्या बेंबीपर्यंत आले, किंवा कुणी आपल्याला दिवसातून इतक्या वेळा फोन केले तर आपण त्या माणसाशी कसे वागू, याचा तो काही वेळ विचार करत बसतो. प्रत्येक जनावराची प्रेम करायची आपापली पद्धत तयार झालेली असते. आपण विमानतळावर आणि मोबाइल फोनवर प्रेम करणारे जनावर होऊ  शकलो नाही याचे त्याला कसेसे वाटते.

त्याने या प्रवासात पाहिलेल्या, खाल्लेल्या आणि चाखलेल्या गोष्टी, माणसे आणि जागा त्याच्या मनाचा ताबा सोडायला तयार नाहीत. त्याच्या अंगाला नवा वास येऊ  लागला आहे.. जो त्याला जाणवतो आहे. घरी परतल्यावर काही दिवस हा वास टिकेल आणि झोपेचे सत्र पुन्हा नीट झाले की तो आपोआप उडून जाईल याची त्याला जाणीव आहे. पण आत्ता त्याच्या मनावर फार आगळे आवरण तयार झाले आहे. नव्या कामाच्या ऊर्जेने, नवीन कामाच्या आखणीच्या कल्पनेने, नव्याने सुचलेल्या काही कथांनी तो भरून गेला आहे. प्रत्येक प्रवासानंतर आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायची जी संधी मिळते ती त्याला फार आवडते. निदान आपण नव्याने डाव मांडून ताजे काहीतरी करू शकतो- ज्याचा आत्मविश्वास आपल्याला परतीच्या प्रवासात आलेला असतो. त्याला नेहमीच हे परतीचे प्रवास फार म्हणजे फार आवडतात. ते कुठेही जाताना केलेल्या प्रवासापेक्षा कितीतरी जास्त रोचक असतात.

त्याला असेच जगायचे होते. हीच त्याची कल्पना होती. फिरायचे.. भरपूर फिरायचे आणि नवे प्रदेश, नवी माणसे पाहत राहायची. घराबाहेर पडले की आपल्या अंगाभोवती पडलेले घट्ट  वेढे सुटून मोकळे होतात. पृथ्वीवरचे सगळेच्या सगळे देश, प्रत्येक जंगल, नद्या, डोंगर आणि शहरे मला पाहायची आहेत असे त्याने लहानपणी एका वहीत लिहून ठेवले होते. पैसे तो फक्त त्यासाठी कमावतो. एकटय़ाने प्रवास करायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा त्याला भीती वाटली होती. प्रत्येकालाच वाटते. आपण सहलीसाठी जात नाही आहोत; प्रवासासाठी जातोय, हे त्याने स्वत:ला समजावले. प्रवास एकटय़ाला करावा लागतो. ओळखीच्या लोकांसोबत होते ती सहल. हळूहळू त्याला सवय होत गेली. प्रवासाची. अनिश्चिततेची. नव्या शहरातील थंडीत मनावर आदळणाऱ्या एकटेपणाची. नव्याने प्रवास करायला त्याच्या देशाबाहेर पडल्यावर त्याने मोकळेपणाने सर्व आकर्षणे अधाशासारखी पूर्ण केली. शरीराची आणि मनाची. त्याच्या देशात जे त्याला मोकळेपणाने करता येत नाही ते त्याने उपभोगले. पुष्कळ जागा आणि शहरे पाहिली.

हे करताना त्याला एक विशिष्ट अनुभव फार वेळा ठळकपणे येत राहिला. खूप चांगले काही पाहिले की त्याला कुणाला तरी सांगावेसे वाटते. शरीराबाहेर तो अनुभव काढायची ऊर्मी तयार होते. काही वेळा ती ऊर्मी इतकी प्रबळ असते, की नवा अनुभव घेताना त्याला तो सांगावा वाटतो. अनुभव नीट, शांतपणे घेऊन, पचवून, त्याचे काय वाटते आहे याचा अदमास घेऊन मग तो मांडावा, इतका त्याला धीर राहत नाही.

यावेळी पिंक फ्लॉईडवरील भव्य प्रदर्शन पाहताना त्याच्या मनाचे पुन्हा तसेच झाले. हा भयंकर ऊर्जा देणारा नवा अनुभव त्याच्या शरीरात एकीकडून शिरत होता आणि कुठूनतरी त्याच वेळी बाहेर पडायला त्याच्या शरीराला आतून धक्के देत होता. आत्ताच्या आत्ता हे सगळे सांगायचे आहे. कुणाला, ते माहिती नाही; पण सांगायला हवे आहे. मग त्याने Instagramचा आधार घ्यायचे ठरवले. आणि शांतपणे काही फोटो काढून ते Instagram वर अपलोड केले तेव्हा त्याला बरे वाटले. या प्रदर्शनाविषयी लिहीत बसायला त्याला वेळ नव्हता. लिहून कुणाला समजले नसते. ते प्रदर्शन पाहताना आणि ते संगीत ऐकताना मनात तयार झालेली प्रचंड खळबळ त्याला मातृभाषेत मांडता आली नसती. व्याकरण आणि शब्द होते, पण त्याचा आस्वाद घेऊ  शकणारे आणि ती खळबळ समजून घेऊ  शकणारे लोक मातृभाषेच्या परिघात नव्हते. प्रत्येक भाषा एक परीघ आणि नीतिमत्ता घेऊन येते. आपल्या मातृभाषेत आपण आपले प्रवास यापुढे प्रामाणिकपणे मांडू शकणार नाही याची त्याला जाणीव झाली तेव्हा त्याने भाषेपलीकडे जाण्यासाठी फोटोग्राफीचा शांत मार्ग निवडला. मातृभाषेत लोकांना सहलींची वर्णने लागतात. आपले प्रवास कुणाला समजून घ्यायचे नसतात, हे त्याला लक्षात आले होते. आपण आपल्या समाजासाठी एक विचित्र जनावर आहोत, हे त्याला उमजून आता काही वर्षे झाली आहेत. त्याने भराभर चार चांगले फोटो काढून  Instagramवर टाकले आणि मग ती ऊर्मी शांत झाली. वारंवार नव्या, तीक्ष्ण गोष्टी अंगाबाहेर फेकून द्यायची ऊर्मी. घट्ट साठून सुखद स्फोट होण्याची वाट पाहत बसणाऱ्या विर्याप्रमाणे नवीन अनुभव घेताना काही वेळा त्याचे मन शांत आणि गोठलेले बनते. पूर्वी तो उभ्या उभ्या जागा मिळेल तिथे पिशवीतली वही काढून लिहीत उभा राहायचा. आता आपल्याला सहजपणे फोटो काढून ते अंतराळात सोडून देता येतात याचे त्याला फारच बरे वाटते. कारण अशावेळी आपण कुणा एकाशी बोलत नसतो. आपल्या अंगातून ती अस्वस्थता बाहेर काढायची असते.

तो एक खरोखरीचा विचित्र प्राणी असावा. यासाठी नाही- की चारचौघांना जे आवडते ते त्याला आवडत नसून वेगळेच काही आवडते. त्यासाठी नाही. तो विचित्र प्राणी यासाठी असावा- कारण तो रोजचे जगणे जगताना वयाने आणि समजुतीने मोठाच होत नाही. तसाच राहतो. तो फक्त प्रवासाला गेला की मोठा होतो. असे काहीतरी त्याचे विचित्र प्रकरण आहे.

kundalkar@gmail.com