माझ्या मनाच्या आतमध्ये जो एक सिनेमा न थांबता अखंडपणे चालू असतो, तो झोपेमध्ये काही वेळा मोहक असे विचित्र स्वरूप धारण करतो. ते स्वप्न नसते. मनाच्या आत दृश्य स्वरूपात चालू असलेली विचारांची शृंखला गाढ झोपेमध्ये वेगाने वाहत राहते आणि त्यामुळे जो प्रश्न किंवा जी भीती मनामध्ये घेऊन मी झोपलो असेन त्याची उत्तरे मला काही वेळा पुन्हा जागा होताना मिळतात. तुम्हालाही असा विलक्षण अनुभव नक्कीच कधीतरी आलेला असेल. मला मनातील हा न थांबणारा सिनेमा फार आवडतो.

मी घाबरलेला माणूस आहे. इतर अनेक बहुसंख्य माणसांप्रमाणे सतत घाबरलेला. घाबरट नाही; घाबरलेला. माझ्या समाजातील, माझ्या परिसरातील इतर सर्व माणसांप्रमाणे मला काही अनुत्तरित गोष्टींची उत्तरे न सापडल्याने सतत भीती वाटते आणि माझा बराचसा वेळ ती भीती आत दडपून टाकण्यात आणि आयुष्य पुढे चालू ठेवण्याची तडफड करण्यात जातो.

आपल्यानंतर आपले असे काय उरेल? आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धात आपले म्हणावे असे माणूस असेल का? ते सापडेल का? आपल्या हातून कुणालाही न घाबरता आणि न संकोचता सातत्याने चांगले काम होत राहील ना? अशा काही भीती या माझ्या खासगी आणि वैयक्तिक आहेत. पण अशा अनेक सामूहिक भीती आहेत, ज्या मी माझ्या समाजातील इतर सर्वासोबत जोडीने अनुभवतो. पण ज्यांची उत्तरे शोधण्याची कोणतीही घाई मी आजपर्यंत केलेली नाही. उत्तरे शोधून ती सापडत नाहीत हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलेले आहे.

आधुनिक नागरी समाजात राहणाऱ्या माणसाला वाटणारी सर्वात प्रबळ आणि जीवघेणी अंतर्गत भीती ही म्हातारपणी येणाऱ्या परावलंबित्वाची असते. कारण नागरी समाजात स्वावलंबन, खासगीपणा आणि स्वातंत्र्य या तीन मूल्यांवर माणसे आयुष्याची बांधणी करत असतात. शारीरिक आणि मानसिक दुर्बलता या तिन्ही मूल्यांपासून आपल्याला लांब नेते.

तुमचे करायला नंतर कुणी उरणार नाही, या भीतीने लहान वयापासून घरातील मोठी माणसे आपल्याला लग्नाच्या आणि संसाराच्या जाळ्यात नकळतपणे ढकलत राहतात. त्यांची स्वत:ची सखोल आणि अंधारलेली भीती पुढील पिढीवर ढकलत राहतात. नुसती भीतीच नाही, तर त्यांनी केलेले भीतीवरचे उपायसुद्धा! लग्न हा त्या भीतीवरचा घरगुती उपाय आहे. त्याचा प्रेमाशी आणि शारीरिक आकर्षणाशी काडीचाही संबंध नसतो, हे आपल्याला चाळिशी आली की लक्षात येते.

नातीगोती, प्रेम, शारीरिक गरजांचे आणि वासनांचे दमन, वंशाची वाढ ही सगळी वरवरची कारणे आहेत. नागरी आणि शहरी समाजात राहून आयुष्याची सतत बदलती स्वरूपे पाहत, वेगवान काळाच्या तालावर नाचत आयुष्य जगणाऱ्या माणसाला शेवटी एकच आत्मसन्मान हवा असतो, तो म्हणजे परक्या माणसाकडून परावलंबित्वाच्या काळात आपल्या शरीराची विटंबना होताना अनुभवायला लागू नये. आपल्या मनाचा आणि शरीराचा संकोच जपला जावा आणि वेळप्रसंगी (म्हणजे रात्री-अपरात्री हृदयाला काही झाले तर) आपले माणूस आपल्या जवळ असावे म्हणून माणसे घाईने जोडीदार शोधतात. इतकेच नाही तर पटपट वयाचे आणि वार्धक्याचे हिशोब करून पुढील पिढी घाईने जन्माला घालतात. (म्हणजे माणसाला घरगुती अ‍ॅम्ब्युलन्स आणि घरगुती नर्स हवी असते का?) वयाच्या मध्यभागी आल्यावर जोडीदाराविषयीचे शारीरिक आकर्षण संपूर्ण आटून गेल्यावर आणि मुले खूप महागडी वागू लागल्यावर मनामध्ये काही पर्यायी विचारांची आंदोलने उमटू लागतात. पण तसे करायची वेळ उलटून गेली आहे हे विजेच्या वेगाने लक्षात येते. अशा वेळी ही भीती घालवायला परंपरेचा आणि कुटुंबव्यवस्थेचा अभिमान खूप मदतीला येतो. मुलांनी चांगले मार्क मिळवले की बरे वाटते. आई-वडिलांनी पार पाडलेला यशस्वी संसार, मागील पिढय़ांनी जमवलेली आणि उभी केलेली संपत्ती, त्यात भर घालायची आपली जबाबदारी अशा अनेक व्यवधानांच्या मागे लागून मनातील कोणताही पर्यायी विचार दाबून ठेवता येतो. वेळच्या वेळी पारंपरिक जगण्याचे सर्व उपाय करूनही मनातील ती भीती कुठेही गेली नाही याची बोचणारी जाणीव काही वेळ विसरता येते. असे सर्व उपाय करूनही शेकडो माणसे एकटीदुकटी मरून संपून जातात.

वयाने मोठे होताना आपण स्वत:ला पाहिलेले असते. पण अनेक वर्षांनी होत्याचे नव्हते झालेल्या आपल्या शहराला आपण पाहू शकत नसतो. तो सिनेमा मनाच्या आतमध्ये पाहायची सवय आपल्या मनाला नसते. आपण आपल्या शरीर आणि मनापलीकडे जिवंत असलेल्या आपल्या शहराचा विचार करू शकत नाही. आपल्या शहराचा एक व्यक्ती म्हणून विचार करायची सवय आपल्या मनाला कुणी शिकवलेली नसते. दर दहा किंवा पंधरा वर्षांत आपल्या आजूबाजूचा परिसर, इमारती, खुरटी, आखीव झाडे, आकाशाचे तुकडे, विजेच्या तारा, मोकळ्या भिंतींवर रंगवलेल्या जाहिराती, जुनी लोभस सिनेमा-नाटकाची घरे, चहाची दुकाने असे ओळखीचे आणि आधाराचे म्हणून जे जे काही आहे ते सर्व होत्याचे नव्हते होणार आहे आणि नवीन स्वरूप धारण करणार आहे, ही जाणीव आपल्याला एकदा  झाली की आपल्या खासगी शरीराच्या बदलत्या स्वरूपाची भीती खूप प्रमाणात कमी होत जाते. हा अनुभव मी घेतला आहे.

मी काही दिवसांपूर्वी ओरहान पामुक या माझ्या आवडत्या तुर्की लेखकाची नवीन कादंबरी वाचायला घेतली. १९८० च्या काळात जेव्हा माणसे शहरात कुदळ-फावडय़ाने विहिरी खणत असत त्या काळात इस्तंबूलमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका जाणत्या, कुशल विहीर खणणाऱ्या कारागिराची आणि त्याच्या तरुण शिष्य आणि सहाय्यकाची ही गोष्ट. ती जणू एका संपून गेलेल्या काळाची आणि शहराच्या वेगाने बदलणाऱ्या स्वरूपाची गोष्ट आहे. शहरापासून लांब, एका रिकाम्या, निर्मनुष्य माळरानावर खोलवर विहीर खोदताना नकळत एक अपघात होतो आणि म्हातारा कारागीर पाणी न लागलेल्या त्या कोरडय़ा, खोल विहिरीच्या आत अडकून पडतो. आपल्या भयंकर चुकीमुळे घाबरून जाऊन तो तरुण साहाय्यक तिथून पळून जातो. तो कारागीर कोरडय़ा विहिरीच्या आत मरून पडला असणार याची त्याला खात्री असते. तो शहरात- घरी पळून येतो आणि ही घटना कुणालाही न सांगता घाबरून पुढील अनेक वर्षे जगत राहतो. शिकतो. मोठा होतो. त्याचे आयुष्य वेगवेगळी नाटय़मय वळणे घेत राहते आणि तो शहरातील एक प्रसिद्ध बिल्डर बनतो. जिथे तो कारागीर मरून पडला होता त्या विहिरीच्या भागात प्रचंड मनुष्यवस्ती तयार होऊ लागते. आणि जे माळरान रिकामे होते ते इमारतींनी आणि बाजारांनी भरून जाते. आणि जी जागा तेव्हा शहरापासून लांब होती ती सावकाश शहराला येऊन जोडली जाते. या तरुण साहाय्यकाच्या मनात ही सल राहते, कीकोणत्या तरी इमारतीच्या खाली खोलवर माझ्या गुरूचे मृत शरीर तसेच पडून राहिले आहे. त्यावर सगळे नवे गजबजलेले उपनगर आकाराला आले आहे. अनेक वर्षांनी तो बेसुमार फोफावलेल्या त्या उपनगरात ते रिकामे माळरान कुठे होते याचा शोध घेत निघतो.

या कादंबरीत एक विलक्षण वाक्य आहे, जे मी पेन्सिलीने अधोरेखित केले. ‘विचार हे नुसते शब्दात नाहीत, तर दृश्यस्वरूपातसुद्धा येतात..’ हे ते वाक्य. ‘विचार दृश्यस्वरूपात येतात’ ही जाणीव मोठी विलक्षण होती. कारण माझ्या मनात चालू असलेला सिनेमा हा माझा मानसिक विकार नसून ती एक साधी-सोपी नैसर्गिक स्थिती आहे हे मला लक्षात आले आणि एकदम शांत वाटले. विचार दृश्यस्वरूपात येतात ती स्वप्ने नसतात. शब्दांत मांडण्याऐवजी आपली बुद्धी आपल्याला चित्रफीत दाखवते. आपण जेवत असताना, प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत उभे असताना, लिफ्टमध्ये सावकाशपणे वर खेचले जात असताना अनेक माणसे हा मनातला सिनेमा पाहत दृश्यस्वरूपात विचार करत उभी असतात. स्वप्नाच्या चलनावर आपली हुकमत नसते, पण या विचारांच्या चित्रफितीवर असते.

माझे पुढे काय होईल, आणि माझी काळजी घेणारे कुणी आजूबाजूला उरेल का, हा विचार माझे मन करायला लागते तेव्हा मला माझ्या मनात दोन मोठी माळराने दिसू लागतात. निर्मनुष्य. मोठीच्या मोठी शहराबाहेरील माळराने.

एक माळरान नाशिकला आहे. कॉलेज रोडच्या राम मंदिराच्या टोकाला. आणि तसेच दुसरे माळरान पुण्याजवळील आकुर्डी या छोटय़ा गावाच्या स्टेशनबाहेर आहे. नाशिकचा कॉलेज रोड आणि आकुर्डीचे रेल्वे लाइनजवळचे माळरान रिकामे आणि निर्मनुष्य आहे. नाशिकच्या माळरानावर मी सायकल शिकतो आहे आणि आकुर्डीच्या माळरानावर माझी आई मोठय़ा हिमतीने दुचाकी शिकते आहे. ती पडू नये आणि तिला काही इजा होऊ नये म्हणून आम्ही भावंडे तिच्या आजूबाजूला तिच्यासोबत धावत तिला प्रोत्साहन देत आहोत. समोर माझा काका उभा आहे- जो या दृश्याचा फोटो काढून काळाला गोठवून ठेवत आहे. त्या रिकाम्या माळरानालाही. तसेच इथे नाशिकला रिकाम्या आणि निर्मनुष्य कॉलेज रोडवरून मी पहिल्यांदाच सायकल एकटय़ाने चालवत, वेगाने वारा कापत रामाच्या मंदिराच्या दिशेने निघालो आहे.

(क्रमश:)

kundalkar@gmail.com