31 May 2020

News Flash

पार्टी

काही माणसे पार्टीचा आनंद घेण्यात वाकबगार असतात. मला त्यांचा फार हेवा वाटतो.

मराठी माणसांना नाचायची फारशी वेळ येत नाही.

लहानपणापासून मला कधीही न जमणाऱ्या अनेक गोष्टी आहेत- ज्या मला अजूनही प्रयत्न करूनही जमत नाहीत. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पार्टी करणे. हल्ली सतत सगळ्यांना काहीही झाले की पार्टी करायची असते. आणि जोरात गाणी लावून बसायचे असते किंवा नाचायचे असते. काही माणसे ‘पार्टी आयोजित करणे’ या कलेत फार वाकबगार असतात. मी त्यापैकी आहे. पण मी बाहेर पार्टीला जाणारा माणूस नाही. मला स्वयंपाक करणे, घर सजवणे, जवळच्या लोकांना बोलावून खाऊ  घालणे, या गोष्टी चांगल्या प्रकारे करता येतात आणि करायला खूप आवडतात. पण मला त्या घरगुती जेवणाच्या छोटय़ा आनंदी क्षणाची मोठय़ा आवाजाची, नाचगाण्याची पार्टी होणार असेल तर मी खूप बावचळून जातो.

काही माणसे पार्टीचा आनंद घेण्यात वाकबगार असतात. मला त्यांचा फार हेवा वाटतो. कारण मला तसे व्हायला जरूर आवडेल; पण तसे होता आलेले नाही. गोंधळ, आवाज आणि अनोळखी लोकांची गर्दी मी एका प्रमाणाबाहेर सहन करू शकत नाही. आता अशा पाटर्य़ा आणि असे मोठे कार्यक्रम माझ्या कामाचा भाग झाले असले तरी मी ठरवून तिथे जाणे टाळू लागलो आहे. अशा वागण्याला वय वाढण्याचे कारण असेल तर याबाबतीत मी पंधरा वर्षांचा असल्यापासून वयस्करच आहे. काही माणसे न थकता आठवडय़ातले सहा दिवस सलग वेगवेगळ्या ठिकाणी पाटर्य़ाना जाऊ  शकतात. आणि तिथे जाऊन ताजेतवाने राहून, अखंड गप्पा मारून, गाल दुखेपर्यंत हसून तितक्याच उत्साहात परत येऊ  शकतात. मला त्या माणसांचा खरोखरच फार हेवा वाटतो.

माझे मित्रमैत्रिणी म्हणतात की, माझा सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न हा आहे, की मी दहा वाजता झोपतो. त्यांच्या मते, ती सामान्य माणसाची बाहेर पडायची वेळ असते. दिवसभर तुम्ही काम करून घरी येता, जेवता आणि झोपता कसे? जेवून बाहेर पडायला हवे. पार्टी करावी आणि मग पहाटे घरी येऊन झोपावे, अशी त्यांची साधी अपेक्षा आहे. पण मला रात्री साडेनऊ पासूनच जांभया सुरू होतात. आणि दहा वाजता मी असेन तिथे आडवा होतो. आता याला मी काय करणार? माझ्या या सवयीमुळे मी पार्टीला जायला अतिशय नालायक माणूस आहे. माझे मित्र आणि मैत्रिणी यामुळे नेहमी माझी चेष्टा करतात. पण मी त्याबद्दल काही करू शकलेलो नाही. मी नेहमी सकाळी पाच वाजता उठतो आणि रात्री दहा वाजता झोपतो. माझी मैत्रीण सई हल्ली मला चेष्टा करायला नेहमी रात्री साडेनऊ  वाजता मेसेज पाठवते.. ‘घासले का दात लेखकांनी? आली का जांभई लेखकांना? झोपले का लेखक?’ त्या मेसेजना मी पहाटे लिहायला साडेचार वाजता उठतो तेव्हा उत्तर देतो. तेव्हा ती शूटिंग संपवून येऊन नुकती चपला-बूट काढत असते. मी अजिबातच निशाचर माणूस नाही.

पार्टी न करता येण्याचे दुसरे कारण म्हणजे नाचता न येणे. आणि नाचण्यासाठी माझ्या मापाच्या कमरेला घट्ट  बसतील अशा पँट नसणे. माझ्या सर्व पँट्स सतत खाली घरंगळत असतात आणि मी त्या दर पंधरा मिनिटाने वर ओढत गावभर फिरत असतो. हे प्रश्न वरील झोपेच्या प्रश्नापेक्षा फार महत्त्वाचे आणि गंभीर आहेत आणि यासाठी काहीतरी तत्काळ करायला हवे हे मला लक्षात येते, पण काही करणे राहूनच जाते. माझ्या आजूबाजूला अगदी गुणवंत फॅशन डिझायनर्स सतत वावरत असूनही मी फक्त दिग्दर्शक आणि लेखक आहे, नट नाही, म्हणून माझ्या कपडय़ांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. आडव्यातिडव्या मापाचे चांगले तयार कपडे बाजारात मिळत नाहीत. या डिझायनर मुलांकडे ज्या शिंपिणी असतात त्यांच्याकडे आमच्या मापाचे टेपच नसतात. कारण वीतभर कंबर आणि वीतभर लांबी असेच कपडे बनवायची त्यांना सवय असते. आपण पार्टीसाठी काही चांगले कपडे शिवायला या सफरचंदे खाऊन दिवस काढणाऱ्या क्यूट मुलींकडे जावे तर त्या ‘या पियानोला कव्हर कसे बरे शिवावे?’ अशा गंभीर नजरेने आपल्याकडे पाहत बसतात. मी अनेक वेळा सूचना करून झाल्या, की बायांनो, कपडे नका शिऊ , पण मला बसेल असा एक चांगला पट्टा तरी आणून द्या. आयत्या आणलेल्या पॅँट्स घरंगळतात. पण माझे कुणी ऐकतच नाही.

नाचाचे आणि माझे तर फारच वाकडे आहे. मी एकदा कॉलेजात असताना पबमध्ये गेलो असता स्वत:ला आरशात नाचताना पाहिले आहे आणि मला स्वत:ची फार धास्ती बसली आहे. मला नाचता येत नाही. अगदी घरात एकटा असतानासुद्धा कधी नवी कथा सुचली किंवा प्रीती झिंटा माझ्यासोबत आइस्क्रीम खायला बांद्रय़ाच्या बाजारात आली तेव्हासुद्धा मी दार बंद करून घरात एकटा नाचलेलो वगैरे नाही. माझे आनंद व्यक्त करायचे मार्ग सगळे एक तर बैठे आहेत किंवा ते आडवे आहेत. जी माणसे पाटर्य़ामध्ये बेभान होऊन अप्रतिम नाचतात त्यांचा मला फार म्हणजे फारच हेवा वाटतो. मलापण नाचावेसे वाटते कधीतरी; पण तसे काही घडतच नाही.

मराठी माणसांना नाचायची फारशी वेळ येत नाही. घरच्या कार्यक्रमात नाही. लग्नात नाही. माझे पंजाबी मित्र आपल्या एका लग्नाला आले होते. ते म्हणाले की, घरात काही कुणाचा मृत्यू वगरे झाला आहे का? मग असे लांब चेहरे करून गंभीरपणे लग्न का केले जात आहे? कुणी नाचत का नाहीये? कुणी दारू का पीत नाहीये? कुणालाच हे लग्न आवडत नाहीये का? मी त्याला म्हणालो की, आमच्याकडे पहिली पंगत आटपून लोकांना ऑफिसचे मस्टर गाठायची घाई असते.. अशी आम्ही माणसे आहोत. त्यामुळे आमच्याकडे लग्नात कुणी नाचगाणी करीत नाहीत. सहजपणे उठून नाचतील अशा आमच्या मावश्या-माम्या नाहीत. आणि नाचताना माझ्या आत्याशी कुणी फ्लर्ट केलेत तर ती एक कानाखाली वाजवेल.

अशा गंभीर आणि सुसंस्कृत समाजात जन्मल्याने मला वाटले होते, कीनाचायचे असते ते फक्त दारू पिऊन गणपती विसर्जनात; घरात नाही. त्यामुळे नाचण्याविषयी एक खूप संकोच लहानपणापासून मनात तयार झाला- जो मी अजूनही संपवू शकलेलो नाही. माझ्या एका मैत्रिणीने एका मुलाशी लग्न केले- जो दिल्लीचा होता. त्याच्या आईने त्या वरातीत नागीण डान्स करून आमचे डोळे दिपवले होते. असे काही मराठी घरात घडणे शक्य नाही. नाचणे आपल्यात बसत नाही. कोणत्याही पबमध्ये गेले कीडान्स फ्लोअरवरची मराठी मुले ओळखणे सोपे असते. कारण ती फक्त बच्चन डान्स करीत असतात.

माझे आयुष्य एक जुने फ्रेंच पुस्तक वाचताना मात्र बदलून गेले. त्यात एका लेखकाची मुलाखत होती आणि त्याने म्हटले होते, ‘पार्टीचा अनुभव तेव्हा चांगला होतो- जेव्हा तुम्ही पार्टीत एका व्यक्तीसोबत येता, पण परत घरी जाताना दुसऱ्याच व्यक्तीला घेऊन जाता. बाकीचे नाचत बसतात.’’ मला हे वाक्य नुसते आवडले नाही तर करून पाहावे वाटले. आणि नाचता न येणारा आणि लवकर झोप येणारा, सामान्य दिसणारा मी या कलेत कमी नाही, हे मला लक्षात आले. हे साध्य होते चांगल्या संभाषणकलेने. नुसते महागडे कपडे घालून हे साध्य झाले नसते. गावभर नाचून हे जमले नसते. एका व्यक्तीसोबत आत जायचे आणि तिला विसरून जाऊन दुसऱ्या व्यक्तीसोबत घर गाठायचे.

माझ्या परीने मी माझ्या कमतरतेवर विजय मिळवू शकलो- जेव्हा मला गर्दीत बसून, न नाचता माणसांना फक्त गप्पांनी वश करून घेण्याची कला सापडली.

लेखक म्हणून ते माझे काम आहे, तो माझा गुण आहे हे मला लक्षात आले आणि मग मला स्वत:च्या बैठेपणाची लाज वाटेनाशी झाली. मला हव्या त्या व्यक्तीसोबत मोठय़ा आवाजी पाटर्य़ाना जाऊनही मला हव्या त्या वेळी, हव्या त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत ती जागा सोडून घरी परतायची कला सापडली. आजूबाजूच्या गोंगाटात न मिसळता तिथेच मध्यभागी बसून आपल्या मनाचे नवीन रसायन घडवण्याची कला सापडायला वेळ लागतो. माणसे पार्टी याचसाठी करतात- की त्यांना ते जे आहेत ते असण्याचा कंटाळा आलेला असतो. दुसरे काहीतरी होऊन पाहायचे असते. गप्पा मारण्यासाठी घरची कौटुंबिक जेवणे असतात. पार्टी करणे म्हणजे स्वत:ला विसरून दुसरे काही होऊन वावरणे. मला ते करायचा माझा कॉस्च्युम सापडला. मी ते करू लागलो आणि करू शकलो तेव्हा मला लहानपणापासून इतरांवर माझी छाप पाडता आली नाही याबद्दलचा न्यूनगंड कमी झाला. मी गर्दीमध्ये राहूनही वेगळा उरायला शिकलो. मी गाल दुखेपर्यंत खोटे हसायचे नाही हे शिकलो. पोटाची वळी रोखून बसायची गरज नाही हे मला लक्षात आले आणि माझी पार्टीत आजूबाजूला असणाऱ्या खोटय़ा प्राण्यांची भीती लांबवर पळून गेली. आणि मला हे लक्षात आले की, पार्टीत कधी आपण कुणाला सोडून देतो आणि कधी कुणी आपल्याला.

जो सोडून दिला जातो, जो तिथे एकटा उरतो त्याच्याकडे खूप मोठी कथा तयार होते. मी अशा सोडून, टाकून दिलेल्या व्यक्तींच्या कथांचा खूप भुकेला आहे. आपणच एखादी व्यक्ती सोडून द्यायची आणि मग तिच्याकडे मोठी कथा तयार झाली की तिला शोधून, तिच्याशी गप्पा मारून ती कथा आत्मसात करून ती लिहून काढायची.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2017 2:19 am

Web Title: writer sachin kundalkar article explain important thing to do in party
Next Stories
1 आपली चित्रपटसृष्टी
2 स्त्रियांचे चित्रपट
3 नाटक लिहिणे..
Just Now!
X