प्रथम वर्ष पदवी प्रवेश-प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाने ‘ऑनलाइन’च्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रवेश-प्रक्रियेतील त्रुटी आणि टाकाऊ तंत्रज्ञान अद्यापि कायम असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
या प्रवेशांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई विद्यापीठ सर्व महाविद्यालयांकरिता वेळापत्रक आखून देते इतपत ठीक आहे. परंतु, त्याकरिता सर्वप्रथम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी (प्री अ‍ॅडमिशन ऑनलाइन रजिस्ट्रेशन) करणे सक्तीचे आहे. मात्र, यासाठी वापरण्यात आलेल्या टाकाऊ तंत्रज्ञानामुळे ही नोंदणी विद्यार्थ्यांकरिता प्रचंड वेळखाऊ आणि मनस्तापाची ठरत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या नोंदणीचा विद्यार्थ्यांना काहीच फायदा नाही. उलट झालाच तर मनस्ताप होत आहे. अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ नये म्हणून विद्यापीठाने आपल्या सोयीकरिता ही नोंदणी सक्तीची केली आहे. परंतु, या नोंदणीनंतर प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अर्ज आणि महागडी माहितीपुस्तिका विकत घेणे, तो भरून देणे या गोष्टी तापदायक आणि पालकांच्या खिशाला तोशीस देणाऱ्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांची सुटका झालेली नाही. काही महाविद्यालयांमध्ये यासाठी १५० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यात येत आहे.
टाकाऊ तंत्रज्ञान
या नोंदणीसाठी वापरण्यात आलेले टाकाऊ तंत्रज्ञान. याकरिता विद्यापीठाच्या  संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागते. यात स्वत:च्या माहिती भरण्याबरोबरच स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, अर्जाचे प्रिंटआऊट असा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे ज्यांच्याकडे ही सोय नाही त्या मुलांना सायबर कॅफेचे खिसे भरण्याशिवाय पर्याय नाही.
त्यातून हा अर्ज इंटरनेट वापरासाठीच्या ‘एक्स्प्लोरर’मध्येच उघडतो. त्यासाठी ‘सिल्व्हर लाइट’ सॉफ्टवेअर वापरले जाते. इतर सॉफ्टवेअरमध्ये उघडल्यास अर्जाच्या केवळ एकाच पानाची प्रिंटआऊट घेता येते. त्यातून हे सॉफ्टवेअरही चांगल्या दर्जाचे असेल तरच सहजपणे प्रिंटआऊट घेता येतो. अन्यथा प्रिंटआऊटची चौकट उघडते आणि थोडय़ाच वेळात गायब होते, असे या प्रकाराने त्रासलेल्या पालकाने सांगितले.
या तांत्रिक खाचाखोचा माहिती नसल्याने ज्यांच्याकडे संगणक, इंटरनेट, प्रिंटआऊट, स्कॅनिंगची सोय असलेल्यांनाही नाइलाजाने सायबर कॅफेचा मार्ग धरावा लागतो आहे. त्यामुळे सायबर कॅफे चालविणाऱ्यांना चांगला धंदा मिळाला आहे.
काही ठिकाणी तर कॅफेच्या चालकांनाही या तांत्रिक बाबी लक्षात येत नसल्याने पालकांचा खोळंबा होतो आहे. मुळात जगभरात इंटरनेट वापरासाठीचे ‘क्रोम’ हे सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यामुळे, हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यायला नको का, असा प्रश्न एका पालकाने केला. विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्यासाठी विद्यापीठाने त्यांना अशा पद्धतीने कामाला लावणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
एमकेसीएलचा नंबर म्हणजे काय?
काही महाविद्यालयांचे अर्ज ऑनलाइन भरावे लागतात. यावर ‘एमकेसीएल नोंदणी क्रमांक टाका,’ असे सांगितले जाते. परंतु, एमकेसीएलचा नंबर टाकायचा म्हणजे कोणता, हे कसे कळणार? ही प्रक्रिया एमकेसीएल राबविते हे मुलांना कुठून ठाऊक असणार, अशी शंका एका पालकाने उपस्थित केली आहे.