20 February 2019

News Flash

शपथेवर खोटी माहिती देणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्राचार्यांवर फौजदारी कारवाई?

अभियांत्रिकी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश

राज्यातील ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यानी आपल्या महाविद्यालयात कोणत्याही त्रुटी नाहीत अशी खोटी माहिती शपथपत्रावर राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालय तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) दिली अशा प्राचार्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत. तसेच या कारवाईची माहिती ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’ला तात्काळ द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. वस्तुत: अशी कारवाई ही ‘एआयसीटीई’ने करणे आवश्यक असताना ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी मौन धारण का केले आहे, असा सवाल तंत्रशिक्षण संचालनालयातील काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांत ‘एआयसीटीई’च्या मानकानुसार जमीन, इमारत, पायाभूत सुविधा, पुरेसे शिक्षक वर्ग नसल्याचे दिसून आले आहे; तथापि ‘एआयसीटीई’ला वेळोवेळी शपथपत्रावर आपल्या महाविद्यालयात कोणत्याही त्रुटी नसल्याची खोटी माहिती प्राचार्याकडून देण्यात येते. तसेच वाढीव जागा अथवा नवीन अभ्यासक्रम सुरू करतानाही त्रुटी नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष तपासणी न करता ‘एआयसीटीई’ने अनेक महाविद्यालयांना वाढीव प्रवेश अथवा अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. या साऱ्यात ‘शिक्षण शुल्क समिती’लाही अंधारात ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी वाढीव फी घेण्यात आली तसेच मागासवर्गीय व आर्थिक दुर्बलांसाठी शासनाकडून होणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीत शासनाचीही शेकडो कोटींची फसवणूक झाली आहे. याची गंभीर दखल घेऊन राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. महाजन यांनी सर्व विभागीय सहसंचालकांना पत्र लिहून आपल्या विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात म्हटल्याप्रमाणे सहसंचालक स्तरावर महाविद्यालयांतील सोयीसुविधा व त्यांनी ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’ला शपथपत्रावर दिलेल्या माहितीबाबत संबंधित प्राचार्याची सुनावणी घेण्यात यावी. या सुनावणीमध्ये ज्या प्राचार्यानी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे सिद्ध होईल अशांवर फौजदारी कारवाई करावी. त्यांच्यावर नोटिसा बजावून सुनावणी तात्काळ घेण्यात यावी तसेच कारवाईची आणि महाविद्यालयातील त्रुटींची माहिती ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’ला कळवावी, असेही डॉ. महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत नेमक्या किती महाविद्यालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या यासाठी डॉ. महाजन यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. ‘एआयसीटीई’ला वर्षांनुवर्षे खोटी माहिती देऊन त्यांची तसेच लाखो विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर ‘एआयसीटीई’ने कठोरपणे कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून अद्यापि अशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

First Published on May 18, 2016 2:37 am

Web Title: criminal proceedings in engineering teachers due to giving fake information