शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण
नगरविकास खात्यामध्ये होणाऱ्या टीडीआर घोटाळ्याप्रमाणे उपनगरातील शाळांमध्ये १०२४ तुकडय़ांचा काही कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ना यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी मंत्रालयात सांगितले.
काही लोकप्रतिनिधींनीच या प्रकरणाची माहिती दिली असून शेखर चन्ने यांची समिती नेमून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे तावडे म्हणाले. शहरातील काही महाविद्यालयांमध्ये पुरेसे विद्यार्थी नसल्याचे दाखवत उपनगरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुकडय़ा हस्तांतरित करण्यात आल्या. मात्र हे करताना तेथील शिक्षकांना उपनगरात न हलवता त्यांचा पगार खाण्याचे तसेच उपनगरात नव्याने अनुदानित तुकडय़ा सुरू करून शासकीय पैशावर डल्ला मारण्यात आल्याचे दिसून येत आहे. यातील गंभीर बाब म्हणजे उपनगरात नव्याने शिक्षकांच्या नियुक्ती करताना काही जणांकडून दहा ते पंधरा लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.
सुमारे १०२४ तुकडय़ांचे अशा प्रकारे बेकायदेशीर स्थलांतर करण्यात आले असून यामध्ये काही लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याची तक्रार आहे.
अहवालामध्ये खरे उघड होणार
या साऱ्या बाबी अहवाल आल्यानंतर उघड होतील व अहवालाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. हा घोटाळा २००९ ते २०११ या काळात झाला असून दक्षिण मुंबईतील शाळांमधील तुकडय़ा बेकायदेशीरपणे हस्तांतरित करताना शिक्षक मात्र तेथेच ठेवण्यात आले.
कपिल पाटील यांच्यावर टीका
शिक्षण विभागाच्या २८ ऑगस्टच्या शासकीय आदेशाचा चुकीचा अर्थ लावून एक लाख शिक्षक अतिरिक्त होणार असून त्यांच्या नोकऱ्या जातील असा अपप्रचार करून शिक्षकांमध्ये घबराट निर्माण करणारे आमदार कपिल पाटील हे एक नंबरचे खोटारडे असल्याची टीका विनोद तावडे यांनी केली. शिक्षण क्षेत्रात काम करत असल्याचा दावा करणारे कपिल पाटील हे मंत्रालय शिक्षकांसाठी कमी वेळ देतात आणि भावाच्या एसआरए योजनेसाठी सहाव्या मजल्यावरच जास्त काळ रेंगाळतात, असेही तावडे यांनी सांगितले.