हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणाऱ्या संच मान्यतेचा निर्णय हिवाळी अधिवेशनाआधी न घेतल्यास अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा मनोदय शिक्षक परिषदेच्या आमदारांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात शिक्षक परिषदेने दोन दिवसांपूर्वी राज्यात रास्ता रोको आंदोलन केले होते. हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून त्यांची नोकरी समाप्त करणारा अन्यायकारक संच मान्यतेचा जूना निर्णय रद्द करू व शिक्षक हिताचा नवीन निर्णय घेऊ असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र याबाबत कोणताही निर्णय न झालेला नाही. याबाबत अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला तरीही निर्णय झाला नाही. याबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शनिवारी तावडे यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता तातडीने निर्णय घेऊ, असे तावडे यांनी स्पष्ट केले.