इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ११व्या आंतरराष्ट्रीय भाषाविज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताने प्रत्येकी एक रौप्य व कांस्य पदक पटकाविले आहे. मँचेस्टर विद्यापीठामध्ये ही स्पर्धा पार पडली. भारतीय चमूतील यश सिन्हा याने रौप्य तर निलय
सारडा याने कांस्य पदक पटकावले. याखेरीज प्रचेतोस मित्रा याला स्पर्धेतील कामगिरीबद्दल विशेष उल्लेख म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. एका प्रश्नाची उकल सवरेत्कृष्टपणे केल्याबद्दल निलय विशेष बक्षिसाचाही मानकरी ठरला.
भाषाविज्ञान ऑलिंपियाड २००२पासून आयोजित केली जात आहे. भारताने या स्पर्धेत २००९ पासून सहभागी होण्यास सुरुवात केली. तेव्हापासून भारताचा या स्पर्धेतील आलेख उंचावत आला आहे.
भाषाविज्ञानचे महत्त्व आजच्या युगात वेगाने वाढते आहे. एकीकडे अनेक भाषा विस्मृतीत जात आहेत. तर दुसरीकडे काही ठराविक भाषांचे महत्त्व वाढते आहे. भारतासारख्या बहुभाषक देशात पूर्वीपासूनच त्रिभाषासूत्रानुसार एकापेक्षा अनेक भाषा विद्यार्थ्यांना शिकता येतात. याखेरीज विद्यार्थ्यांना भारताबाहेरही भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत विविध भाषांचे दस्तावेजीकरण, तसेच भाषिक वैविध्यांचा अभ्यास करणे अधिकाधिक गरजेचे बनले आहे.
तांत्रिक क्षेत्रातही भाषाविज्ञानाचे महत्त्व वाढते आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या माहिती-तंत्रज्ञानविषयक संस्थांना मशीन ट्रान्स्लेशन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इत्यादीसाठी कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्समध्ये प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. त्या मानाने भारतात भाषाविज्ञानात प्रशिक्षित असणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी आहे.
ऑलिंपियाडसारख्या स्पर्धाच्या माध्यमातून शालेय जीवनापासूनच भारतीय विद्यार्थ्यांना भाषाविज्ञानाची ओळख करून देता येईल या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाने ऑलिंपियाडसाठी भारतीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या विभागाने सुरू केलेल्या ‘पाणिनी भाषाविज्ञान ऑलिंपियाड कार्यक्रमा’अंतर्गत या वर्षी खास प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून निवडलेल्या पाच सवरेत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या चमूने ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. आगामी वर्षांतही इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांतून या कार्यशाळांचे आयोजन विभागातर्फे केले जाणार आहे.