मान्यता नसताना विविध वैद्यकीय अभ्यासक्रम चालविल्याच्या तक्रारीवरून पुण्याचे ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ (टिमवि) आणि अमरावतीचे ‘पंजाबराव देशमुख मेमेरिअल मेडिकल महाविद्यालय’ (पीडीएमएमसी) यांची अखेर चौकशी करण्यात येणार आहे.
या दोन संस्थांबरोबरच राज्यातील एकूण पाच संस्थांमध्ये विविध वैद्यकीय, नर्सिगविषयक अभ्यासक्रम अनधिकृतपणे चालविले जात असल्याची तक्रार ‘फोरम फॉर फेअरनेस इन इज्युकेशन’ या स्वयंसेवी संस्थेने ऑगस्ट, २०१४मध्ये राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दाखल केली होती. मात्र, गेले पाच महिने सरकारने या तक्रारीवर काहीच केले नव्हते. आता यापैकी दोन संस्थांच्या चौकशीचे आदेश या विभागाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने बजावले आहेत.
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र अनधिकृत संस्था आणि अभ्यासक्रम प्रतिबंध कायद्या’अंतर्गत ही नोटीस संबंधित संस्थांना बजावली आहे. परंतु, वर्षभर याची अंमलबजावणीच करण्यात आली नव्हती. ‘टिमवि’वर आयुर्वेद, योग या विषयातील अभ्यासक्रम केंद्रीय नियामक संस्थांची मान्यता न घेता राबविल्याचा आरोप आहे. तर ‘पीडीएमएमसी’कडे एमडी, एमएस या संस्थेकडे ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एमसीआय) या केंद्रीय नियामक संस्थेची मान्यता आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर संस्थेला राज्य सरकारच्या परवानगीने अभ्यासक्रम सुरू करता येतात. पण, संस्थेने ही परवानगी न घेताच अभ्यासक्रम सुरू केल्याचा आरोप आहे.
फोरमने केलेल्या तक्रारीवरून नोटीस बजावताना संचालनालयाने संबंधित संस्थांना २८ जानेवारीला चौकशीकरिता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सक्षम प्राधिकारी म्हणून वैद्यकीय शिक्षण संचालक हे संस्थांची चौकशी करतील. त्यावेळी अभ्यासक्रमाचा प्रकार, कालावधी, प्रवेश पात्रता, प्रवेश क्षमता, सुरू झालेले वर्ष आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.
या संबंधात ‘आम्हाला अशी नोटीस अजून तरी मिळालेली नाही. तसेच, आमच्या सर्व अभ्यासक्रमांना संबंधित नियामक संस्थांची मान्यता आहे,’ असा दावा टिमविचे कुलगुरू दीपक टिळक यांनी केला. तर ‘पीडीएमएमसी’चे अधिष्ठाता डी. एस. जाने यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
रेश्मा शिवडेकर, मुंबई