वशिलेबाजीचा टेकू लावून वर्षांनुवर्षे एकाच शाळेमध्ये सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दस्तुरखुद्द महापौर सुनील प्रभू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून वशिलेबाजीचे ‘तट्टू’ आजही शाळांमध्ये मनमानी कारभार करीत आहेत. या संदर्भात पालिका आयुक्तांकडेही तक्रार करण्यात आली आहे. मात्र त्यांनीही या तक्रारीची दखल घेतलेली नाही.
महापालिकेच्या एखाद्या शाळेत सात वर्षे सेवा झाल्यानंतर शिक्षकाची बदली करावी असा नियम आहे. तसेच एकाच शाळेत कमाल १० वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांची बदली करणे अनिवार्य आहे. मात्र मुंबईतील काही शाळांमध्ये शिक्षक १५ ते २० वर्षे सेवा बजावित आहेत. आपली बदली होऊ नये यासाठी ही शिक्षक मंडळी शिक्षणाधिकाऱ्यांपासून ते थेट स्थानिक नगरसेवकांपर्यंत सर्वाची मर्जी संपादन करीत आहेत. अनेक शिक्षक वरिष्ठांची छोटी-मोठी कामे करून त्यांची मर्जी संपादन करीत आहेत. काही शिक्षक आपली बदली होऊ नये यासाठी ज्ञानदानासारखे पवित्र काम सोडून थेट वरिष्ठांच्या घरची कामे करायलाही कमी करीत नाहीत. अनेक वर्षे एकाच शाळेत मनमानीपणाने वागणाऱ्या या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. या संदर्भात महापौर सुनील प्रभू यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. इतकेच नव्हे तर काही नगरसेवकांनीही त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन महापौरांनी शिक्षणाधिकारी रवींद्र भिसे यांना २८ नोव्हेंबर रोजी पत्र पाठविले होते.
पालिका शाळांमध्ये अनेक शिक्षक १५ ते १८ वर्षे सेवा बजावत आहेत. काही शिक्षक अन्यत्र बदली झाल्यानंतर वशिल्याने तीन महिन्यांतच पुन्हा जुन्या शाळेत बदली करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्य शिक्षकांवर अन्याय होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ कळवावा, असे महापौर सुनील प्रभू यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. मात्र एक महिना लोटला तरी शिक्षण विभाग ढिम्म असून या प्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. त् आजही अनेक शिक्षक आपल्या मर्जीच्या शाळेत टिकून आहेत. या प्रकारावरुन सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचेच स्पष्ट होत आहे.     
काय आहे प्रकरण ?
काही शिक्षक अन्यत्र बदली झाल्यानंतर वशिल्याने तीन महिन्यांतच पुन्हा जुन्या शाळेत बदली करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्य शिक्षकांवर अन्याय होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ कळवावा, असे महापौर सुनील प्रभू यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. मात्र एक महिना लोटला तरी शिक्षण विभाग ढिम्म असून या प्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही.