पहिली ते दुसरीसाठी परिसर अभ्यास, तिसरीपासून पुढे सामान्य विज्ञान विषयाची सुरुवात होते. पुढे विज्ञान विषयाचा विस्तृत अभ्यास येतो. विज्ञानाच्या अभ्यासाला इतके महत्त्व असूनही अनेक शिक्षक तो आवडीने शिकवीत नाहीत. जालन्यातील ‘सी.टी.एम.के. गुजराथी विद्यालया’तील प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम करणारे संजय टिकारिया गेल्या सहा वर्षांपासून विज्ञानातील नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून या विषयाची गोडी लावत आहेत.
जालन्यामध्ये संजय टिकारिया यांनी २००७साली ‘माझी छोटीशी प्रयोगशाळा’ हा उपक्रम सुरू केला. पेटीसदृश त्यांच्या या प्रयोगशाळेत घरगुती साहित्य व टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाचे प्रयोग करता येतील अशी टिकाऊ साधने तयार केली आहेत. या पेटीत टाचणीपासून ते छोटय़ा मायक्रोस्कोपपर्यंत अनेक वस्तू आहेत. अपकेंद्रित मशीन, विलयनकारी नरसाळे, स्वस्त आणि मस्त सूक्ष्मदर्शक, आरशाच्या गमतीजमती, १५ प्रयोग सांगणारा चेंडू, अणू-रेणूचा अभ्यास, चुंबक असे कितीतरी हातांनी तयार केलेले साहित्य आहे. जालन्यातील अनेक शाळांमध्ये ही छोटीशी प्रयोगशाळा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. काही शिक्षकांनी या पेटीपासून प्रेरणा घेत त्यापेक्षाही चांगली प्रयोगशाळा तयार केली. २००९ साली त्यांनी ‘फिजिक्स ऑल इन वन’ हा भौतिकशास्त्राचे बारावीपर्यंतचे विविध १५० प्रयोग करता येतील, असा रेडीसेट छोटय़ाशा सूटकेसमध्ये तयार केला होता. ही सूटकेस तीन कप्प्यांची होती आणि तिचा वापर फळा म्हणूनही करता येतो. या सूटकेसच्या माध्यमातून अतिशय अवघड वाटणाऱ्या भौतिकशास्त्राचे साध्या व सोप्या पद्धतीने प्रयोग साहित्य देऊन त्याची गोडी लावली.
प्रयोग मानव – सिंगापूरच्या एका अभ्यासदौऱ्यात मिळालेल्या गॅझेटच्या माध्यमातून त्यांनी ‘प्रयोग मानव’ तयार केला. या गॅझेटमध्ये समोरची वस्तू पाहायची की त्याचा आवाज आपल्या कानात ऐकू येतो. या गॅझेटला त्यांनी चायना मेड टेपरेकॉर्डर व बॉक्स जोडला. एका मोबाइल चीपच्या मदतीने तो सुरू केला. या प्रयोगाद्वारे मानवाच्या माध्यमातून ध्वनी, वीज, न्यूटनचे गतीविषयक नियम समजावून सांगता येतात.

मुलांना विज्ञान विषय आनंददायी वाटावा यासाठी नॅनो लॅबचा प्रयोग केला. यात विद्यार्थ्यांना स्वत: करता येतील असे ३०० विविध प्रयोग आहेत. बालमानसशास्त्राला धरून हे प्रयोग आखण्यात आले आहेत. ‘बायो लॅब विथ मल्टी डेमो बोर्ड’ या माध्यमातून जीवशास्त्रातील विविध किचकट आणि वेळखाऊ प्रयोग लवकरात लवकर कसे करावे यासाठी मार्गदर्शन केले जाते. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य घराघरात मिळते. यात तिसरी ते दहावीच्या १७७ प्रकारच्या प्रयोगांचा समावेश आहे. श्वसन यंत्र, पाण्याची धारकता मोजणे, आर. के. इंडिकेटर, मूळ, खोड, पान याचे स्पेसिमन कसे मिळवायचे, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आदी प्रयोग या साहित्याच्या आधारे करता येतात.
टिकारिया यांनी त्यांच्या सी.टी.एम.के. शाळेत ४० बाय ६५ आकाराच्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी प्रयोगशाळा तयार केली आहे. यात विविध विषयाची उपकरणे, प्रयोग आहेत. चौथीपासूनच्या मुलांना या ठिकाणी मुक्त प्रवेश आहे. ही प्रयोगशाळा कधीच बंद नसते. मधल्या सुट्टीत ते मुलांना येथील विविध विज्ञान साहित्याशी खेळायला लावतात. प्रयोगशाळेत हात लावता येईल अशा ठिकाणी मानवी कवटी ठेवण्यात आली आहे. मुले तिला हात लावतात. त्यामुळे त्यांची भीतीही पळून गेली आहे.
टिकारिया यांनी विज्ञान विषयाची आवड मुलांना लागावी यासाठी असे विविध प्रयोग केले. बंद अवस्थेत पडलेल्या प्रयोगशाळांची दारे शाळांनी खुली करावी, असे आवाहन ते करतात. त्यातूनच मुलांची प्रयोग करण्याची क्षमता वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संपर्क – ७३५०५८१५१५