News Flash

कॉपीमुक्तीला ‘मुक्ती’ दिल्याचा परिणाम?

अमरावती, औरंगाबादमध्ये निकालातील २५ ते ३० टक्के वाढीबद्दल शंकारेश्मा शिवडेकर, मुंबईकॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद आणि अमरावती विभागांच्या बारावी परीक्षेच्या निकालात यंदा तब्बल २५ ते ३०

| May 31, 2013 04:07 am

अमरावती, औरंगाबादमध्ये निकालातील २५ ते ३० टक्के वाढीबद्दल शंका
रेश्मा शिवडेकर, मुंबई
कॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद आणि अमरावती विभागांच्या बारावी परीक्षेच्या निकालात यंदा तब्बल २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनैसर्गिक अशी ही वाढ या विभागात गेली काही वर्षे राबविल्या जाणाऱ्या ‘कॉपीमुक्ती अभियाना’ला यंदा ‘मुक्ती’ दिल्यामुळे झाली आहे की इथले विद्यार्थी यंदा मान मोडून अभ्यासाला लागल्याने झाली आहे, याविषयी ‘कुतूहल’ निर्माण झाले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद, अमरावती, लातूर या विभागातील काही जिल्हे कॉपीसाठी अगदी कुख्यात आहेत. इथली शाळा-महाविद्यालयेच आपला निकाल उंचावण्यासाठी शिक्षक, गावकऱ्यांच्या मदतीने कॉपीस उत्तेजन देतात, अशी टीका होत असते. दोन वर्षांपूर्वी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून आलेल्या श्रीकर परदेशी यांनी मात्र मोठय़ा कार्यक्षमतेने हे कॉपीचे रॅकेट उखडून टाकले होते. परिणामी कॉपीला वावच न मिळाल्याने नांदेडबरोबरच संपूर्ण लातूर विभागाचा निकाल धडाक्यात खाली आला.पण, या वर्षी या विभागांचे निकाल पुन्हा एकदा अनैसर्गिकरित्या वधारले आहेत.
२०१२ साली औरंगाबाद मंडळाचा निकालात सुमारे २५ टक्के तर अमरावतीच्या निकालात २० टक्क्य़ांनी वाढ झाली. लातूरचा निकालही ८ टक्क्य़ांनी वाढला. बारावीच नव्हे तर कोणत्याही परीक्षेच्या निकालातील एवढी वाढ अनैसर्गिक समजली जाते.

‘मुले अभ्यासाला लागल्याने निकाल वधारला?’
अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राम पवार यांच्या मते कॉपीची संधी न राहिल्याने या विभागातील विद्यार्थी अभ्यासाला लागले असून शिक्षकही त्यांना अधिक गांभीर्याने शिकवू लागले आहेत. मात्र ‘तसे असेल तर चांगलेच आहे. पण, गुणवत्तेचा आलेख असा एका वर्षांत उंचावत नसतो. निकाल अचानक इतका उंचावण्याचे कारण कॉपी रोखण्याची मोहीम शिथील होण्यात आहे. त्यामुळेच या भागात पुन्हा एकदा या गैरप्रकारांनी डोके वर काढले,’ असा दावा शिक्षण विभागातील एका उच्चाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला. कॉपीमुक्ती अभियान कोणाही एकामुळे यशस्वी होत नाही. सूसूत्रतेच्या अभावामुळे यंदा कॉपीमुक्त अभियान या भागात अयशस्वी झाले, अशी शक्यता व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 4:07 am

Web Title: result increased effect of copy free examination stoped
टॅग : Examination,Hsc
Next Stories
1 तोंडी, प्रात्यक्षिकच्या गुणांची ‘खैरात’ वाया
2 यशवंतराव चव्हाण विद्यापीठात ‘ब्रह्मकुमारी’चा अभ्यासक्रम!
3 खासगी विद्यापीठांचा मार्ग मोकळा
Just Now!
X