कोणतीही ‘सामाइक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) न देता खासगी नर्सिग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अनधिकृत ठरल्याने ६४० विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे.
या विद्यार्थ्यांना राज्यातील विविध खासगी महाविद्यालयांमध्ये नर्सिगच्या पीएस्सी, पीबी बीएस्सी आणि एमएस्सी या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात आले होते. परंतु, कोणत्याही सीईटीविना हे प्रवेश देण्यात आल्याने त्यांचे प्रवेश बेकायदा ठरवून ‘प्रवेश नियंत्रण समिती’ने रद्द ठरविले. मात्र, ही बाब या विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांनी सुरुवातीला लपवून ठेवली. आता मात्र, लाखो रुपयांचे शुल्क आणि अनुदान मोजून नियमबाह्य़ पद्धतीने प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांनी या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
‘या अभ्यासक्रमांसाठी सीईटी देणे बंधनकारक आहे, हे महाविद्यालयांनी आम्हाला सांगितलेच नाही. त्यामुळे, आम्हीही शुल्क भरून प्रवेश घेतले. पण, नंतर जेव्हा आमचे निकाल रोखून ठेवण्यात आले तेव्हा कुठे आम्हाला ही गडबड लक्षात आली,’ असे सुजो जोस या विद्यार्थ्यांने सांगितले. ‘त्यानंतरही आम्ही हा प्रश्न सोडवू. याचा तुमच्या करिअरवर परिणाम होणार नाही, असे आश्वासन महाविद्यालयाकडून देण्यात आल्याने आम्ही शांत राहिलो. पण, हा सर्व बनाव होता, हे आमच्या नंतर लक्षात आले,’ अशी पुस्ती त्याने जोडली. हा प्रश्न न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांचे काय करायचे ते राज्य सरकारवर सोपविले आहे.
आमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी कर्ज काढून शुल्काची रक्कम भरली आहे. त्यांचे भवितव्य या फसवणुकीमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने आमच्या प्रश्नात लक्ष घालून आमचे प्रवेश अधिकृत ठरवून आम्हाला आमचा अभ्यासक्रम पूर्ण करू द्यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. आपल्या मागण्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी हे विद्यार्थी २३ जानेवारीपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करणार आहेत.
आता चारच महिने राहिले आहेत..
नर्सिगचे पहिल्या वर्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. दुसऱ्या वर्षांच्या परीक्षेला आता केवळ चार महिने राहिले आहेत. परंतु, आमचा पहिल्या वर्षांचा निकालच न लागल्याने आम्ही दुसऱ्या वर्षांच्या परीक्षेलाही बसू शकत नाही, अशा शब्दांत एका विद्यार्थिनीने आपली अडचण मांडली.