राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशांसाठी द्यावी लागणारी २०१४ची ‘असो-सीईटी’ देखील राज्य सरकारच्या ‘एमएच-सीईटी’प्रमाणे ‘नीट’ या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’साठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार होणार असल्याचे खासगी संस्थाचालकांच्या ‘एएमयूपीएमडीसी’ या आयोजक संघटनेने जाहीर केले आहे. असो-सीईटी अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना एएमयूपीएमडीसीने अभ्यासक्रम जाहीर केल्याने याचा फटका खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
सीईटीचा अभ्यासक्रम व स्वरूप वर्षांच्या सुरवातीला जाहीर करणे अपेक्षित असते. सरकारी सीईटींच्या बाबतीत ही खबरदारी नेहमीच घेतली जाते. ज्यावेळेस ती घेतली गेली नाही, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिले आहे. २०१२च्या ‘नीट’ला सर्वोच्च न्यायालयाने स्थागिती देण्यामागे हे देखील एक महत्त्वाचे कारण होते. त्यापासून धडा घेत राज्य सरकारने वर्षभर आधीच किंवा किमान वर्षांच्या सुरुवातीलाच अभ्यासक्रम जाहीर केले आहेत. ‘नीट’ रद्द झाल्यानंतर जून, २०१३मध्येच राज्य सरकारने ‘एमएच-सीईटी’ ‘नीट’च्या अभ्यासक्रमानुसार होईल, असे जाहीर केले होते. तसेच, या परीक्षेचे स्वरूपही नीटप्रमाणेच ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हा न्याय बहुधा खासगी शिक्षणसंस्थांना लागू नसावा. त्यामुळेच, परीक्षा दोन महिन्यावर आली तरी एएमयूपीएमडीसीने अभ्यासक्रम जाहीर करण्याची तसदी घेतली नव्हती. साधारणपणे २५ ते ३० हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात.
‘असो-सीईटी’साठी ९ मार्चला देण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार ही परीक्षा १८ मे रोजी होणार आहे. मात्र यासाठीचा अभ्यासक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, असे यात स्पष्ट करण्यात आले असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. यासंदर्भात ‘एएमयूपीएमडीसी’चेअध्यक्ष डॉ. कमलकिशोर कदम यांना विचारले असता ‘असो-सीईटी’ ‘नीट’च्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे. अर्थात नीटप्रमाणे निगेटिव्ह गुणांची पद्धत आम्ही अवलंबलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील १३७ खासगी महाविद्यालयांचे प्रवेश असो-सीईटीतून केले जातील. भौतिकशास्त्र (५०गुण), रसायनशास्त्र (५०गुण) आणि जीवशास्त्र (१००गुण) अशी २०० गुणांसाठी ही परीक्षा होईल.

जागा वाढणार
महाराष्ट्रात ठाणे, संगमनेर या ठिकाणी नवीन खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. जूनपर्यंत या महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एमएच-सीईटी किंवा असो-सीईटी या दोघांपैकी कोणताही एक पर्याय जरी त्यांनी स्वीकारला तरी एमबीबीएसच्या आणखी सुमारे १५० ते २०० जागा वाढतील.

प्रश्न व उत्तरतालिका ऑनलाइन
एमएच-सीईटीप्रमाणे असो-सीईटीची प्रश्नतालिका व उत्तरतालिकाही परीक्षा झाल्यानंतर आठवडाभरात ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. यंदा असो-सीईटीचे अर्जही ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. १० मार्चपासून अर्ज स्वीकृतीला सुरूवात होणार आहे.

आतापर्यंत असो-सीईटी ही राज्य सरकारच्या एमएच-सीईटीप्रमाणे होत आलेली आहे. त्यामुळे, आम्ही अभ्यासक्रम जाहीर केला नसला तरी आमची २०१४ची सीईटीही एमएच-सीईटीनुसारच होईल हे अपेक्षित होते. विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देतात. आमचा अभ्यासक्रम वेगळा ठेवून आम्हाला त्यांना अतिरिक्त अभ्यासाचा ताण द्यायचा नव्हता. म्हणून आम्ही आमची असो-सीईटी राज्य सरकारप्रमाणे नीटच्या अभ्यासक्रमानुसारच घेण्याचे ठरविले आहे.
– डॉ.कमलकिशोर कदम, अध्यक्ष,
असोसिएशन मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकर अ‍ॅण्ड डेंटल कॉलेजेस महाराष्ट्र (एएमयूपीएमडीसी)