शिक्षणप्रवाहाबाहेरील कातकरी समाजाच्या मुलांना शिक्षणप्रवाहात आणत आचरा भंडारवाडी शाळेच्या शिक्षकांनी ‘सारे शिकू या, पुढे जाऊ या’ हे ब्रीद सत्यात उतरवले आहे. शाळेचे नाव काढल्यावर लपून बसणारी ही मुले आता दिवस उजाडल्यावर शाळेत जाण्यासाठी आईवडिलांच्या मागे लागतात. ‘आव मला शाळंत जायचं’ म्हणत शाळेत जाण्याची तयारी करू लागतात. शाळेच्या इतर मुलांमध्ये ती आता मिळूनमिसळून राहू लागली आहेत.
आचरा बागेश्रीवर वस्तीस असणाऱ्या कातकरी समाजाची ही मुले. गणेश निकम आणि अंकुश पवार. यातील अंकुश पवार याचे आईवडील लहानपणीच त्याला सोडून गेले. अनाथ झालेल्या अंकुशला मग गणेश निकमच्या वडिलांनीच पित्याचे छत्र दिले. त्याला आपल्या मुलाप्रमाणेच माया दिली. ही मुले शाळेत येणाऱ्या या शिक्षकांच्या नजरेस पडली. आणि त्यांनी त्यांच्या पालकांना आणि मालकांनाही, या मुलांना शाळेत पाठविण्याची विनंती केली आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मालकाच्या आदेशावरून त्या मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठविण्यास राजी झाले.
 अगदी गलिच्छ असलेल्या या मुलांना शाळेत आणताना, इतर मुलांसोबत शिकविताना खूप त्रास व्हायचा. सुरुवाती सुरुवातीला त्यांना शाळेतच आंघोळ घालण्याचे काम सुर्वेबाईंना करावे लागे. इतर मुलांनीही त्यांना आपले कपडे देऊन सहकार्याचा हात पुढे केला. एक दिवस ही मुले शाळेत आली तर दुसऱ्या दिवशी लपून राहायची. मग त्यांना शोधून पकडून शाळेत आणा, त्यांना स्वच्छ करा असले उद्योग या शिक्षकद्वयाला करावे लागले. शिक्षकांबरोबरच शाळेतील मुले आणि पालकांनीही सहकार्य केल्याने या मुलांना शाळेत यायची सवय जडली. इतर मुलांच्या मानाने या मुलांची आकलन शक्ती बेताची असल्याने कलाकलाने शिकवून त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण केली. आता तर ही मुले शाळा उघडण्यापूर्वीच शाळेत हजर होतात. त्यांच्या अंगी स्वच्छता बाणविण्यात यश आल्याने ही मुले आता टापटीपही राहू लागली आहेत.
कातकरी समाजाच्या या मुलांची मानसिकता बदलण्याचे, त्यांना शाळेची गोडी लावण्याचे सारे श्रेय या शाळेचे मुख्याध्यापक गणेश दळवी आणि शिक्षिका नंदिता सुर्वे यांना द्यावयास हवे.  
इंग्रजी माध्यम शाळांच्या आक्रमणापुढे सध्या प्राथमिक शाळांची संख्या रोडावत चालली आहे. पटसंख्येअभावी शाळा बंद पडण्याचे गंडांतर अनेक शाळांवर ओढवले आहे.
शिक्षणप्रवाहाबाहेरील मुलांना शालेय प्रवाहात आणल्यास त्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईलच; पण शाळांची पटसंख्या पण वाढू शकते. शिवाय वाममार्गाला लागणाऱ्या या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्यास वाईट प्रवृत्तीही कमी होतील. प्रवाहाबाहेरील मुलांना शिक्षणप्रवाहात आणून मुख्याध्यापक गणेश दळवी आणि शिक्षिका नंदिता सुर्वे यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.