टीवाय बीएससीच्या परीक्षांच्या प्रवेश पत्रांमध्ये चुका आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. काहींच्या प्रवेशपत्रांमध्ये परीक्षेची तारीख तर काहींच्या प्रवेशपत्रात विषयच बदलण्यात आलेला आहे.  
टीवाय बीएससीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रांमध्ये चुका आढळून आल्या आहेत. ‘अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रमेंटेशन’ या विषयाऐवजी प्रवेशपत्रावर फिशरी आणि बायोलॉजी असा विषय छापून आला आहे. तर ‘सॉलिड स्टेट फिजिक्स’ या विषयाची परीक्षा ही परिपत्रकानुसार २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण प्रवेशपत्रावर जुनी तारीख छापून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या चुकांना सर्वस्वी महाविद्यालये जबाबदार आहेत. अशा कॉलेजांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेने केली आहे. यासंदर्भात सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी प्र-कुलगुरूंची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली.
यानंतर परीक्षा विभागाने प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील चूका दुरुस्त करून देण्याचे आदेश दिले आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर चुका आहेत त्यांनी प्राचार्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.