मुंबईतील परीक्षार्थीना औरंगाबादसारख्या गैरसोयीच्या ठिकाणी केंद्र
केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध सेवा पदांकरिता २१ एप्रिल रोजी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या वतीने होणाऱ्या ‘कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल’ (टायर एक) या स्पर्धा परीक्षेसाठी मुंबईतील अनेक परीक्षार्थीना औरंगाबादसारख्या गैरसोयीच्या ठिकाणी केंद्र देण्यात आल्याने उमेदवारांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागणार आहे. हा घोळ कमी म्हणून की, १४ एप्रिलची परीक्षा २८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन आयोजकांनी उमेदवारांना द्विधा मनस्थितीत टाकले आहे. कारण २८ एप्रिलला स्टेट बँक ऑफ इंडियाची स्पर्धा परीक्षा ‘क्लॅश’ झाल्याने हजारो उमेदवारांना दोहोंपैकी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या वतीने देशभरात ‘कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल’ ही परीक्षा घेण्यात येत आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क, लेखा परीक्षण विभाग आदी आस्थापनांमधील टायर एक स्तराच्या २७ पदांसाठी १४ आणि २१ एप्रिल अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा घेतली जाणार होती. यापैकी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आल्याने आयोगाने पहिल्या टप्प्यातील परीक्षा रद्द करून ती २८ एप्रिलला घेण्याचा निर्णय घेतला. पण, याच दिवशी एसबीआयची प्रोबेशनरी ऑफिसर्स ही प्रतिष्ठेची परीक्षा आल्याने उमेदवारांना दोहोंपैकी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
त्यातून मुंबईतील शेकडो उमेदवारांना त्यांच्या शहरापासून दूर असणारे परीक्षा केंद्र देऊन आयोगाने मोठय़ा संकटात टाकले आहे. बहुतेक उमेदवारांना औरंगाबाद येथे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ‘परीक्षा केंद्राबाबत घातलेल्या घोळाबाबत आम्ही आयोगाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तासनतास प्रयत्न करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही,’ अशी तक्रार विनय गावकर या उमेदवाराने केली. नवी मुंबई येथे राहणाऱ्या विनय यांना औरंगाबादचे केंद्र देण्यात आले आहे. दूरध्वनीवर संपर्क साधण्यात यश न आल्याने त्यांनी आयोगाला ई-मेलच्या माध्यमातून आपली अडचण लक्षात आणून दिली. मात्र, ‘ई-मेल करून दोन दिवस झाले तरी आपल्या प्रश्नांना उत्तर मिळालेले नाही,’ अशी तक्रार त्यांनी केली. खारघर येथे राहणाऱ्या निवेदिता मोरे यांनाही असाच अनुभव आला. त्यांनाही औरंगाबाद येथे परीक्षा केंद्र ठरवून देण्यात आले आहे. पण, याबाबत आयोगाशी दूरध्वनीवरून संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रार त्यांनी केली.