08 March 2021

News Flash

खिचडी

लीळा चरित्रातही खिचडीचा उल्लेख होतो.

आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

भारताच्या खाद्यसंस्कृतीचा नकाशा बनवायचा झाला तर त्या नकाशावर प्रांताप्रांतांतील अनेक पदार्थाचं वैशिष्टय़ं अगदी सहज उमटेल, पण सर्वच ठिकाणी जो पदार्थ साम्यस्थळासारखा शोभून दिसेल तो असेल खिचडी. भारतातल्या प्रत्येक प्रांतांत खिचडी पकते. खिचरी, खिचुरी, किशरी.. नावं काही द्या, पण साधारणपणे कृती तीच. भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांतही खिचडीमाहात्म्य मोठं आहे. आपला खिचडीशी असलेला ऋणानुबंध घट्ट असण्याचं कारण म्हणजे जवळपास सर्वच प्रांतांत बाळाचं पहिलं घन भोजन खिचडीने सुरू होतं. खिमट/ खिमटी आणि मग खिचडी अशा प्रवासात आपले खिचडीसोबतचे धागे पक्के होतात. पुढे सगळे पदार्थ खाऊपिऊ  लागलो तरी एखाद्दिवशी खिचडी, पापड, लोणचं हा साधा बेतही स्वर्गसुख देऊन जातो. अनेकदा खिचडी म्हटल्यावर आजारी माणसाची उदास कळाही चेहऱ्यावर उमटते. पण तरीही अतिशय आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ भारतीय उपखंडच नव्हे तर दक्षिण आशियाची खास ओळख आहे.

खिचडीचं अस्तित्व प्राचीन आहे. संस्कृत ‘खिच्चा’पासून खिचडी शब्दाचा उगम दिसून येतो. भात हा प्रमुख आहार असणाऱ्या देशात या भातावर विविध प्रयोग न होते तर नवल! त्यातलाच सर्वात पौष्टिक, सात्त्विक प्रयोग म्हणजे खिचडी. ज्या कोणा पुण्यात्म्याला खिचडी करून पाहावीशी वाटली तो धन्य असावा! पुढच्या अनादी काळासाठी त्याने समस्त स्त्रीवर्गावर आणि कधीमधी स्वयंपाक करणाऱ्या पुरुषवर्गावरही थोर उपकार करून ठेवले. कारण इतक्या कमी वेळात तयार होणारा तरी पोटभरीचा व पौष्टिक अन्य पदार्थ नसावा. प्रवासातून दमून आलोय, खिचडीच टाकते किंवा आज दुपारचं जेवण जरा जड झालंय, रात्री खिचडीच कर. या वाक्यांतून खिचडीची उपयुक्तता उत्तम अधोरेखित व्हावी.

ग्रीक राजदूत सेल्युलस आपल्या लिखाणात धान्यांच्या खिचडीचा उल्लेख करतो. मोरोक्कन प्रवासी इब्न बटुटा इ.स. १३५० च्या दरम्यान ‘किशरी’ कशी लोकप्रिय होती हे नमूद करतो. १५ व्या शतकात दक्षिण आशियाला भेट देणारा रशियन साहसी प्रवासी निकितीनदेखील खिचडीची आवर्जून दखल घेतो. महानुभाव पंथाच्या लीळा चरित्रातही खिचडीचा उल्लेख होतो. म्हणजे भारताच्या अनेक प्रांतांत खिचडीच्या अस्तित्वाचे ठसे प्राचीन आहेत. ही खिचडी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत समान भावाने नांदताना दिसते. मुघलांनी या खिचडीला शाही स्पर्श देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साध्या, सरळ, सात्त्विक खिचडीमध्ये सुकामेवा, मसाल्यांचं आगमन मुघल काळात झालं. मुघलांची ही खासियत म्हणावी की अट्टहास? अगदी साध्याशा पदार्थालाही नटवून-सजवून त्यात श्रीमंती थाट आणण्याचा त्यांचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी दिसतो. त्याला खिचडीही अपवाद नाही. ऐन-ए-अकबरी या ग्रंथात खिचडी बनवण्याच्या सात पाककृतींचा उल्लेख आहे. जहांगीरने त्याच्या काळात या खिचडीला लोकप्रिय केलं तर औरंगजेबालाही खिचडी प्रिय होती. अशा मिळणाऱ्या दाखल्यातून एकच जाणवतं की, अतिशय साध्या, सरळ अशा या प्रकृतीची भुरळ सर्वसामान्यांपासून थेट राज्यकर्त्यांनाही जाणवत आली आहे. आपल्या शाही खाण्यासाठी प्रसिद्ध मुघलही या खिचडीच्या साधेपणातील सौंदर्याला भुलले.

खिचडीचं हे माहात्म्य ब्रिटिश राजवटीत कमी न होता वाढलंच. भारतीयांचं मसालेदार तिखट जेवण न सोसवणाऱ्या ब्रिटिशांना खिचडी वरदान वाटली. मात्र या खिचडीत मासे वा अंडय़ांचा वापर ही ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी केलेली सुधारणा होती. भारतीय आहाराचा प्रभाव घेऊन ब्रिटिश त्यांच्या मूळ देशी गेले. जाताना केजरी (ङीॠि१ी) न्यायला विसरले नाहीत. तिथल्या शब्दकोशातही या शब्दाला स्थान मिळालं आहे.

प्रांताप्रांतांतील खिचडीच्या पाककृतींबद्दल लिहायचं तर पानंच्या पानं कमी पडतील. बंगाल प्रांतात ‘खिचुरी’चं प्रस्थ मोठं आहे. पावसाळ्याच्या दिवसात घरोघरी खिचडीचा बेत असतो. अगदी देवाच्या नैवेद्यातही खिचडीला स्थान आहे. बिहार प्रांतात दर शनिवारी अनेक घरांत खिचडीच पकते. रविवारच्या खास बेतासाठी आदल्या दिवशी पोटाला आराम द्यायचा हेतू त्यामागे आहे वा नाही याची कल्पना नाही, पण मकरसंक्रांतीच्या सणाला आणि शनिवारी बिहारमध्ये ‘खिचडीराज’ असते. गुजराती खिचडी आने कढी त्या संस्कृतीचा सगळा सारांशच घेऊन येते. महाराष्ट्रीय खिचडीबद्दल काय बोलावं? मुगाच्या डाळीसोबतचा तिचा घरोबा आपल्या सगळ्यांच्याच पसंतीस उतरला आहे. उन उन खिचडी, साजूक तूप, लोणच्याची फोड, भाजलेला पापड आणि तळलेली मिरची.. बस्स! जगण्यासाठी आणि काय हवं? सोडय़ाची खिचडी हा मांसाहारींचा स्वर्ग. साबुदाण्यासह मात्र ती एकदम तिच्या ओरिजनल सात्त्विक रूपात शिरते.

या खिचडीचा आपल्या लोकसमजुती व कथांमधला उल्लेख महत्त्वाचा आहे. ‘क्या खिचडी पक रही है?’मध्ये गूढता आहे. ‘अपनी खिचडी अलग पकाना’मध्ये सगळ्यांपासून वेगळं होण्याची भावना आहे. तर बिरबलाच्या खिचडीत ताणलेली दीर्घता आहे. या कथा, हे वाक्प्रचार खिचडीच्या जोडीने किती छान भावना मांडतात! खिचडीचा हा एक वेगळा पैलू.

खिचडीकडे पाहताना हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’मधला संवाद आठवत राहतो. ‘सादगीमेंही सुंदरता है’. भाताचे विविध प्रकार आहेत. मात्र पुलाव बिर्याणीचा शाही थाटही काही वेळा खिचडीच्या सादगीपुढे फिका पडावा. रोज पुलाव वा बिर्याणी परवडणार तर नाहीच, शिवाय प्रकृतीला झेपणारही नाहीत. खिचडीचं तसं नाही. ती लहानपणापासून आपल्याला पौष्टिक काही देण्याचा प्रयत्न करते. घाईगडबडीत आयत्या वेळी मदतीला धावून येते. आजारपणात साथ देते. म्हणजे बघा, खूप भडक मेकअप करून लक्ष वेधून घेणाऱ्या मंडळींच्या गोतावळ्यात एखादी साधी, पण सुंदर स्त्री जसं लक्ष वेधून घेते तसं खिचडीचं आहे. अर्थात याच खिचडीच्या अतिरेकाने रोज रोज काय तेच तेच किंवा खिचडी खाऊन आजारी असल्याचा फिल येतो असं म्हणणारे काही विरोधक आढळतात, हेदेखील खरं आहे.

बाहेर कडाक्याची थंडी किंवा पावसाची संततधार असावी आई किंवा आजीने गरमागरम खिचडी ताटात वाढावी. त्या पिवळसर गरम वाफांसोबत येणारा तांदळाचा, डाळीचा मिश्र सुगंध तुपाच्या धारेने ओलावून जावा. त्यानंतरचा प्रत्येक घास सांगत राहतो.. अन्न हे पूर्णब्रह्म!

ग्रीक राजदूत सेल्युलस आपल्या लिखाणात धान्यांच्या खिचडीचा उल्लेख करतो. मोरोक्कन प्रवासी इब्न बटुटा इ.स. १३५० च्या दरम्यान ‘किशरी’ कशी लोकप्रिय होती हे नमूद करतो.  १५ व्या शतकात दक्षिण आशियाला भेट देणारा रशियन साहसी प्रवासी निकितीनदेखील खिचडीची आवर्जून दखल घेतो. खिचडीची उपयुक्तता व लोकप्रियता कालातीत आहे. लीळा चरित्रातही खिचडीचा उल्लेख होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:08 am

Web Title: history of khichadi
Next Stories
1 पिझ्झा
2 नानखटाई
3 मोदक
Just Now!
X