आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

काही सण आणि पदार्थ यांचं नातं अतूट असतं. होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू तसं गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपतीबाप्पांच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांच्या डोळ्यांसमोर २१मोदकांचं ताट तरळू लागतं.गणेश चतुर्थी, संकष्टी, विनायकी, एकादशीनिमित्ताने मोदक हवेतच. बाप्पा आणि त्याचे प्रिय मोदक यांचं नातं पक्कं आहे. एकाच वेळी, एक गोड पदार्थ म्हणून,धार्मिक कार्यातील नैवेद्याचा भाग म्हणून आणि अस्सल मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा राजदूत म्हणून इतका मान लाभलेला अन्य पदार्थ नसावा. आपल्यासाठी आपली खाऊगिरी व मोदक यांच्यामध्ये प्रश्नांचं जाळं कधी विणावंसं वाटत नाही. बाप्पाला प्रिय तर आम्हालाही प्रिय असं साधं गणित आहे. तरीही अनेक गणेश कथांपैकी एका कथेत या मोदकाचा उगम सापडल्यासारखा वाटतो.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

ही कथा सांगते की, पुराणकाळात देवीदेवतांनी अमृतापासून बनवलेला दिव्य मोदक देवी पार्वतीला देऊ  केला. देवी पार्वतीचे दोन पुत्र स्कंद आणि गणेश त्या मोदकास पाहून भुलले. आपणासच हा दिव्य मोदक मिळावा असा हट्ट करू लागले. पार्वतीने त्या दोघांनाही मोदकाचे वर्णन करून सांगितले आणि त्याउपर जो पुत्र धर्माचरणात श्रेष्ठता बाळगेल त्याला आपण तो मोदक देऊ , असे आश्वस्त केले. त्याक्षणी स्कंद तीर्थक्षेत्रांची परिक्रमा करण्यास गेला तर गणेशाने फक्त मातापित्यांना प्रदक्षिणा घातली.  देवी पार्वतीने पूजा, यज्ञ, मंत्र, तीर्थक्षेत्रे एकीकडे तर मातापिता एकीकडे असे मत व्यक्त करत गणेशाच्या बाजूने कौल दिला आणि गणेशाचे मोदकाशी नाते जुळले ते कायमचे.

पुराणातील सर्वच कथांना वास्तवाचा आधार आपण शोधू पाहात नाही. तरीही मोदक नामक पदार्थ व गणपतीचा ऋणानुबंध प्राचीन आहे हे मात्र यातून नक्की अधोरेखित होते. मोदकाचा उल्लेख जुना असला तरी आपण आज जे उकडीचे वा तळलेले मोदक खातो त्याचीच पाककृती पूर्वापार प्रचलित आहे वा नाही याबाबतीत संदेह निर्माण होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अगदी प्राचीन काळापासून लाडवांनाही मोद देणारे या अर्थाने काही ठिकाणी मोदक म्हटले आहे. त्यामुळे आपण खातो त्या मोदकांची पाककृती कधी प्रत्यक्षात आली याचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. इसवी सन ७५० ते १२०० या दरम्यान वर्णिल्या गेलेल्या काही पदार्थामध्ये मात्र या उकडीच्या मोदकाचे धागेदोरे सापडतात. खोबरं न वापरता इतर वेगळी सामग्री वापरून गोड सारणाच्या साहाय्याने तयार एका पदार्थाची पाककृती मोदकांशी मिळतीजुळती आहे. मात्र त्या पदार्थाचे नाव ‘ठडुंबर’ असे नमूद केले गेले आहे. मोदकासारखीच पाककृती असणाऱ्या एका अन्य पदार्थाला      ‘वर्षील्लक’ असे म्हटले आहे. मात्र त्याच्या पाककृतीत दुधाचा वापर दर्शवला गेला आहे. तांदळाचे पीठ वापरून बनवल्या गेलेल्या एका पदार्थाला मोदकच म्हटले आहे.

यावरून असे म्हणता येईल की, विविध पदार्थाच्या पाककृतींच्या मिश्रणातून आताच्या मोदक नामक पदार्थाचे रूप सिद्ध झाले असावे. त्यातही खोबऱ्याचे, खव्याचे, पुरणाचे, सुक्यामेव्याचे हे आणि असे विविध मोदक प्रकार आपण अनुभवू शकतो. मोदकाचा बाह्य़ आकार निश्चित आहे. आतलं सारण आापापल्या पाककौशल्यानुसार बदललं जातं. अनेकदा पाककला स्पर्धामधून किंवा टीव्ही कार्यक्रमांतून मोदकावर विविध प्रयोग होताना आपण पाहतो. त्याचं कारण मोदकाच्या रूपात दडलेलं आहे. मोदकाच्या पोटातली पोकळी या प्रयोगांसाठी आपल्याला खुणावते.

मोदक वळता येणं ही कला आहे. पाककौशल्यात सुबकपणाचा निकष ठेवला तर मोदक आपली छान परीक्षा घेतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात मोदक होतात, पण योग्य ती उकड, गोलसर पारी, कंजूसपणा झळकेल इतकं कमीही नाही व मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही असं सारण, रेखीवपणे जुळत जाणाऱ्या पाकळ्या व अखेर तो कोचदार तुरा हे सगळ्यांनाच जमत नाही. काही घरांत लाडवाचा भाऊ  शोभेल असा तो गोल गोळा होतो .तर काही घरात एकेक पाकळी मोजून घ्यावी इतका तो देखणा दिसतो.

गणपतीबाप्पांच्या या लाडक्या नैवेद्याचं सध्या होणारं स्थित्यंतर खूप सुखावणारं आहे. अनेक लग्नांमध्ये मराठी स्वीट कुझीन म्हणून मोदकांची वर्णी लागू होतेय. मराठी लग्नातच नव्हे तर पंजाबी गुजराथी लग्नातही मोदकांची मागणी वाढतेय. लग्नाच्या केटरिंगमधल्या काकूंचं झटपट मोदक करण्याचं कसब अनेकांना अचंबित करतंय. गुलाबजाम, अंगुरबासुंदी, जिलेबी यांच्या जोडीला आपले मोदकराव तुपाच्या धारेसोबत पंगतीची शोभा वाढवताना दिसू लागले आहेत. हा बदल खरंच खूप आश्वासक आहे.

हिरवंगार केळीचं पान, त्यावर छान डावं-उजवं करून वाढलेला नैवेद्य आणि जोडीला सुबक, पांढरेशुभ्र, रेखीव मोदक पाहताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्यात अनामिक सात्त्विक भाव असतो. समोर गणरायाची मूर्ती, तिच्या डोळ्यातली ती ऊर्जा, तो शांत भाव या साऱ्याला अनुभवत तुपाच्या धारेत न्हालेल्या मोदकाचा आतलं सारण सांभाळत घेतलेला घास जी अनुभूती देतो त्याने पोटच नाही तर मन भरतं. म्हणूनच खऱ्याखुऱ्या अर्थाने तो मोद, आनंद देणारा ‘मोद-क’ आहे.

– रश्मि वारंग