शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वृद्ध आरोपीस येथील न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. गोविंद बाळू घाडगे (वय ७४) या आरोपीस दहा हजार रुपये दंड ठोठावला. सदरची घटना १८ मार्च २०१४ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. शिवाजीनगर, कणेरीवाडी येथील पीडित मुलींचे कुटुंबीय व आरोपी घाडगे हे शेजारी आहेत. त्या दिवशी या दोन्ही मुली शाळेतून आल्यावर आत्याच्या घरासमोर खेळत असताना त्यांना घाडगे याने आपल्या घरी बोलवून घेतले.

माडीवर नेऊन पोटमाळ्यावरील दोरी काढण्याचा बहाणा करीत त्याने दोघींवर लंगिक अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने त्यातील पहिली मुलगी आईला सांगते म्हणून पळत घरी आली. तर दुसरीला त्याने धरून ठेवत लंगिक अत्याचार केला. पहिली मुलगी रडत घरी आल्याने तिच्या आईने विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. तिच्यासह आई व अन्य नातेवाईक घाडगेच्या घरी गेले असता घाडगे याने मी नाही त्यातला असा बहाणा केला.

या प्रकरणी  पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी आरोपी घाडगे याला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोन्ही मुलींचा जबाब, शेजारी, मुलींची आई, आत्या यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. आरोपीच्या दंडाची रक्कम दोन्ही मुलींच्या पालकांना देण्याचा आदेश सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी शुक्रवारी वृध्दास दिला.