विमा कंपनीने अमोल पवार याचा ३५ कोटींचा विमा उतरविताना त्याच्या मालमत्तेची माहिती घेतली होती काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच अमोल पवार याला आíथक रसद पुरवणाऱ्या त्या दोन नगरसेवकांची माहिती गोळा केली असून त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. बनावाचा हा कट विमा उतरविल्यापासून शिजला होता काय, याची चौकशी करुन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह, नगरसेवकांना सहआरोपी करणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
३५ कोटींच्या विम्याची रक्कम हडपण्यासाठी तसेच कर्जाच्या तगाद्यातून सुटका करुन घेण्यासाठी अमोल जयवंत पवार, विनायक जयवंत पवार या दोघांनी रमेश कृष्णाप्पा नाईक याचा खून करुन स्वतच्या अपघाती मृत्यूचा बनाव केला होता. या प्रकरणाचा उलगडा करत पवार बंधूंना पोलिसांनी अटक केली होती.
अमोल पवारच्या बांधकाम व्यवसायात शहरातील दोन नगरसेवकांनी गुंतवणूक केली होती. तसेच काही कामात आडकाठी करुन पवारकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्या दोन नगरसेवकांच्या कुंडल्या पोलिसांनी तयार केल्या असून पवार व नगरसेवकांच्यात झालेल्या आíथक व्यवहाराची माहिती घेण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे.
विमा कंपनीने अमोल पवारचा ३५ कोटींचा विमा कोणत्या आधारे उतरविला, यासाठी कोणत्या कागदपत्रांची पडताळणी केली, तसेच पवारची कोणती मालमत्ता तपासली याचा शोध पोलीस घेत आहेत. ३१ मार्चचे टाग्रेट पूर्ण करण्यासाठी विमा कंपनीने नियमबाह्य पद्धतीने विमा उतरवीला आहे काय, तसेच विम्याची रक्कम हडपण्याचा कट कंपनीतूनच शिजला काय ,याची माहिती पोलीस घेत आहेत. अमोल पवार याचा विमा उतरविणाऱ्या त्या एजंटची चौकशी पोलिसांनी केली असून त्या आधारे विमा अर्जावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत याची माहिती पोलीस गोळा करत आहेत.