प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळ येथे शुक्रवारी विठुरायाच्या नामघोषात, टाळमृदंगाच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या भक्तिरसात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात पार पडली.  कोल्हापूर-नंदवाळची पायी वारी हजारो भाविकांच्या प्रतिसादात संपन्न झाली.  सुमारे तीनशे गावच्या दिंडय़ांनी या वारीत सहभाग घेतला होता.

येथून जवळ असलेल्या नंदवाळ गावाला प्रति पंढरपूर नावाने संबोधले जाते. तेथील भव्य विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. त्यासाठी कोल्हापूर ते नंदवाळ अशी पायी वारी निघते. त्याचा प्रारंभ पहाटे साडेपाच वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात काकड आरतीने झाला. सहा वाजता महाअभिषेक पार पडला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ‘पंढरीनाथ महाराज की जय..’च्या जयघोषात शहरातील प्रमुख मार्गावरून पालखीस प्रारंभ झाला. उभा मारुती चौकात पालखी आल्यानंतर या ठिकाणी उभ्या रिंगण सोहळय़ाचा आनंद भक्तांनी घेतला. निवृत्ती चौकात साहेबराव काशिद यांच्या वतीने वारकऱ्यांना खिचडी व कॉफीचे वाटप करण्यात आले. पालखी नंदवाळ येथे आल्यानतंर सर्वच भक्तांनी डोळे भरून विठुरायाचे दर्शन घेतले. जिल्हय़ातील हजारोंपेक्षाही अधिक भक्तगणांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. सुमारे तीनशे गावच्या दिंडय़ांनी या वारीत सहभाग घेतला होता.

िंगण सोहळय़ात हरपले भान

नंदवाळला मार्गस्थ झालेली पालखी पुईखडी येथे आल्यानंतर अपूर्व असा रिंगण सोहळा झाला. या रिंगण सोहळय़ात मधोमध माउलींची पालखी, त्या भोवती पताकाधाऱ्यांचे कडे, त्यामागे बाहेरील बाजूस तोंड करून रिंगण सोहळा पाहण्यास आलेले प्रेक्षक अशा संपूर्ण लवाजम्यात अत्यंत सुंदर, देखणा असा रिंगण सोहळा संपन्न झाला.  ‘माउली, माउली’ या अखंड गजरात पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. रिंगण असलेल्या सर्व भाविकांनी ताल धरला होता. महिलांनीही ओव्या गात फुगडीचा फेर धरला होता. हा रिंगण सोहळा सर्वच दिंडीकऱ्यांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारा ठरला.

दिंडीच्या मार्गात अनेक प्रमुख ठिकाणी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भक्तांसाठी फराळाचे वाटप करण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. दिंडीतील वारकऱ्यांना केळी, खिचडी, राजगिरा लाडू, खजूर, चहाचे वाटप करण्यात आले. सेवाभावी संस्थांच्या वतीने काही ठिकाणी मोफत प्राथमिक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होत्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हासूर यांच्या वतीने रुग्णवाहिकेचे आयोजन करण्यात आले होते.

 मंदिरात विठुनामाचा टाहो

शहरातील विविध मंदिरांत मोठय़ा उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने अंबाबाई मंदिर, मिरजकर तिकटी, पद्मावती मंदिर शेजारी, शाहुपुरी ४ गल्ली, बुरुड गल्ली, मर्दानी खेळाचा आखाडा, यादवमहाराज मठ, उत्तरेश्वर येथील भाविक विठोबा, प्रॅक्टिस क्लब, हत्तीमहाल रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयानजीक असणारे विठ्ठल मंदिर या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.