आघाडय़ा, पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

जिल्ह्य़ातील ९ नगरपालिकांच्या प्रचाराची राळ शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत थंडावली. रविवारी नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान होत असून निवडणुक यंत्रणा सज्ज आहे. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ७३६ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व जण साहित्य घेऊन केंद्राकडे रवाना झाले आहेत.

[jwplayer poPcqTHM]

या निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्य़ातील नऊ नगरपरिषदांसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. पालिका जिंकण्यासाठी राज्यातील सत्ताधारी व विरोधक यांनी गेल्या महिनाभरापासून कंबर कसली आहे. त्यासाठी सुरू केलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. मतदानाला साडेनऊ तास उरले तरी यंदा प्रचार सुरूच राहिला. शक्तिप्रदर्शन करणाऱ्या मिरवणुका काढण्यात आल्या. काही ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आल्या. रात्री दहा वाजता प्रचार संपल्यानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी लक्ष्मीदर्शनाचा प्रसार चालवला.

जिल्ह्यात एकूण ४७२ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय २ हजार ७३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचारी तसेच झोनल ऑफिसर यांचा समावेश आहे. याची नगरपरिषदनिहाय माहिती पुढील प्रमाणे आहे.

मलकापूर-६२, कुरुंदवाड-१५३, कागल-१९५, मुरगुड-१०७, पन्हाळा-४७, वडगाव-१७८, गडिहग्लज-१७९, जयसिंगपूर-२९२ आणि इचलकरंजी-१५२३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबरोबरच पोलीस दलाकडून आवश्यक पोलीस बंदोबस्त तनात ठेवला आहे.

४७२ मतदान केंद्रे

नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात ४७२ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. यामध्ये इचलकरंजी – २७४,  जयसिंगपूर ५१, कागल ३२, गडिहग्लज २८, वडगाव २७, कुरुंदवाड २६, मुरगुड १७, मलकापूर ९ आणि पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीसाठी ८ मतदान केंद्रांचा समावेश आहे.  ९ नगरपरिषदांचे १०१ प्रभाग असून ३ लाख ६२ हजार इतके मतदार आहेत. यामध्ये इचलकरंजी २ लाख १९ हजार, जयसिंगपूर ४० हजार ७३४, कुरुंदवाड १९ हजार, वडगाव १९ हजार ९८६, मलकापूर ४ हजार ६८८, पन्हाळा २ हजार ६९७, कागल २३ हजार ८९१, मुरगुड ९ हजार ४५०, आणि गडिहग्लज  २१ हजार ८९७ मतदारांचा समावेश आहे.

[jwplayer voXexKMV]