दयानंद लिपारे

शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरूपदासाठी स्थानिक उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक ते प्र-कुलगुरू असा विद्यापीठाचा तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉ. दिगंबर शिर्के यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे.

नूतन कुलगुरूंसमोर विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हान तर आहेच. खेरीज सर्व विद्याशाखांमध्ये समन्वय ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, प्राध्यापकांचा संशोधनाचा दर्जा वाढवताना त्यांचे प्रशासकीय कौशल्य पणाला लागणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी गेली सहा महिने इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू होती. देशभरातील १६९ उमेदवारांनी आपल्यापरीने प्रयत्न सुरू केले होते. याला राजकीय रंगही लागला होता. सरतेशेवटी ही जबाबदारी कोल्हापूरचेच सुपुत्र असलेले डी. टी. तथा दिगंबर शिर्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठात अध्ययन केलेल्या आणि पुढे विविध अधिकार मंडळावर सदस्य, कुलसचिव आणि प्र-कुलगुरू अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. विद्यापीठातील शेवटची कुलगुरूपदाची राहिलेली एकमेव खुर्चीही आता त्यांनी प्राप्त केली आहे. प्रामाणिक प्रयत्नाचे फलित म्हणून ही जबाबदारी आपल्याकडे आल्याचे शिर्के सांगतात. त्यांना विविध पातळ्यांवरील कामातील खाचाखोचा यांची जाणीव आहे. गेली अनेक वर्षे ते कोणत्या ना कोणत्या पदाच्या माध्यमातून प्रत्येक कुलगुरूंच्या सोबत काम केले आहे. झोकून देऊन काम करण्याची पद्धत आणि वादातील प्रतिमा या त्यांच्या जमेच्या बाजू. पण विद्यापीठात मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेले विसंवादाचे वातावरण त्यांना बदलावे लागणार आहे.

सामूहिक प्रयत्न गरजेचे

विद्यापीठ म्हटले की नानाविध राजकीय-सामाजिक विचारांचे प्राध्यापक, सेवक, विद्यार्थी असणार. प्राध्यापक सेवक यांच्यामध्ये संघभावना निर्माण करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याचा अभाव निर्माण झाला होता. त्याचे दुष्परिणाम गुणवत्तावाढीवर झाले. त्यामुळे सर्व घटकांना एकत्रित करून पुढे जाण्याचा निर्धार शिर्के यांनी व्यक्त केला आहे. मागील प्रत्येक कुलगुरूंनी देशातील प्रमुख विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाचा समावेश असल्याचा दावा केला होता. या विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लौकिक असेल तर शेजारच्या जिल्ह्य़ातून विद्यार्थी शिकायला का येत नाही याचे चिंतन कधी झालेच नाही.

अलीकडच्या काळात व्यासंग आणि प्रशासनावर प्रभाव असलेले कुलगुरू मिळाले नाहीत, असे विद्यापीठातच बोलले जाते. हे चित्र बदलण्याची जबाबदारी नव्या कुलगुरूंना पार पाडावी लागणार आहे.

विद्यापीठाचा दर्जा तेथील संशोधनावर ही निश्चित होत असतो. मात्र मागील अनुभव हा चिंताजनक असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. ‘रुसा’सह अन्य केंद्र व राज्य सरकारमधून संशोधन प्रकल्प आले; पण ते ठरावीक विद्याशाखांकडे सोपवले गेल्यामुळे अन्य प्राध्यापकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नंतर विद्यापीठांनी आपल्या निधीतून संशोधनाची कामी संशोधन करण्यावर भर दिला. नवोदितांकडे जबाबदारी दिल्याने अन्य प्राध्यापकांची नाराजी कायम राहिली.

राजकीय दबावाचे काय?

विद्यापीठाचा चेहरा-मोहरा बदलून सर्वागीण विकास करणार असल्याचे नूतन कुलगुरूंनी निवडीनंतर स्पष्ट केले आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकीय दबाव असल्याचे आणि त्याचेच अधिक नियंत्रण असल्याचे जाणवत आले आहे. विद्यापीठ कायदा आणि परिनियम त्याची अंमलबजावणी केली जात नाही. राजकीय दबावातून नियम डावलले जातात. त्यामुळे प्राध्यापक, सेवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने टोकाचे आंदोलन करावे लागत असल्याचे चित्र नित्याचे आहे. अधिसभा, व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून निर्णय होतात. हा राजकीय दबाव झुगारून नवे कुलगुरू या आव्हानाला कसे सामोरे जातात यावर त्यांच्या नैतिक धैर्याची कसोटी लागणार आहे. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी माझी कारकीर्द समर्पित राहील, अशी ग्वाही दिली आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी विविध राजकीय संघटनांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरत असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा, प्रवेश या पहिल्या आव्हानाला नव्या कुलगुरूंना सामोरे जाताना गुणपत्रिका, परीक्षेतील अनागोंदी यामुळे मलिन झालेली प्रतिमा सुधारावी लागणार आहे. विद्यापीठाला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनवण्याच्या इरादा डॉ. शिर्के यांनी व्यक्त केला आहे. यासाठी विद्यापीठाचे तिजोरी ही भक्कम असणे गरजेचे आहे. शासनाने विद्यापीठांना मर्यादित खर्चात कामकाज करावे, अशा सूचना दिल्या आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवून विकासाची कामे करणे हे कडवे आव्हान संख्याशास्त्र निपुण कुलगुरूंपुढे आहे.