कोल्हापूर : इचलकरंजीतील खून, खुनाच्या प्रयत्नासह खंडणी व अन्य गंभीर गुन्ह्यंच्या अभिलेख्यावरील ‘जर्मन गँग’वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याचे दोषारोपपत्र पुणे येथील विशेष मोका न्यायालयात दाखल करण्यात आले. राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरी दिली, अशी माहिती तपास अधिकारी आर. बी. शेडे यांनी मंगळवारी येथे दिली.

टोळीचा म्होरक्या अविनाश शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, आकाश आण्णाप्पा भिलुगडे, नईम हसन कुकूटनूर, मनोज वामन शिंगारे, बजरंग अरुण फातले ऊर्फ बाचके, प्रशांत विनायक काजवे यांचा समावेश आहे. या सराईतावर शिवाजीनगर, वडगाव, शहापूर (ता. हातकणंगले), कुरुंदवाड (ता. शिरोळ) पोलीस ठाण्यात १३  गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अविनाश जर्मनी व साथीदारांनी इचलकरंजी, कबनूर, शहापूर परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. अवैध व्यवसाय, गुन्हेगारीसह औद्योगिक वसाहतीतील कामगारांवर वर्चस्व निर्माण करून आर्थिक गुन्हे करण्यात सराईत सोकावले होते. प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही टोळीची दहशत वाढतच राहिली. टोळीविरुद्ध ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला होता.

पोलीस महानिरीक्षकांनी त्यास मंजुरी दिली होती. या मोका कारवाईचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी केला.