काँग्रेसअंतर्गत वादाला कारणीभूत ठरणारे आमदार महादेवराव महाडिक यांना वगळून कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला आहे. पक्षाचे निवडणूक निरीक्षक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत महाडिक यांना गृहीत न धरता काँग्रेस पक्ष गटबाजीला तिलांजली देऊन महापालिका निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या उमेदवारांची ७५ टक्क्यांहून अधिक यादी तयार असून निवडणुका जाहीर होताच ती घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस पक्षाची बठक पार पडली. निरीक्षक डॉ. कदम यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदींशी चर्चा करून आढावा घेतला. महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी सर्वानी एकदिलाने प्रयत्न करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यानंतर काँग्रेस पक्षाच्या तयारीबाबतची माहिती पत्रकारांना देताना महापालिका निवडणूक गट-तट विसरून एकत्रित लढविणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.
आमदार महाडिक यांच्या अनुपस्थितीबाबत छेडले असता डॉ. कदम म्हणाले, त्यांचा एकूण वावर पाहता त्यांच्याशिवाय महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार आहे. त्यांच्या भूमिकेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी गांभीर्याने विचार केला असून त्यांच्याशिवाय पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी निवडणुका घोषित होताच जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन मोठय़ा जाहीर सभा होणार आहेत. याशिवाय, कोपरा सभा व घरोघरी प्रचारावर भर दिला जाणार आहे. शहराचा सर्वागीण विकास हा प्रचाराचा मुद्दा राहणार असून त्यावर आधारित जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.
जिल्हाध्यक्ष पाटील यांनी विकासाचे मुद्दे सोडून इतर मुद्दे कशाला लावून धरता असा मुद्दा उपस्थित केल्यावर पत्रकारांनी महाडिक हे पक्षाविरुद्ध सतत बोलत असताना त्यावर तुमची भूमिका काय, असे छेडल्यावर जिल्हाध्यक्षांनी चुप्पी साधणे पसंत केले. सतेज पाटील यांनी मालोजीराजे व कार्यकत्रे संपर्कात असल्याचे सांगितले तरी त्याचा तपशील मात्र देऊ शकले नाहीत.