आक्रमक विरोधकांमुळे वार्षिक सर्वसाधारण सभाध्यक्ष विजय पाटकर यांची कोंडी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्याकडील देय रक्कम आणि गतवर्षीच्या सभेतील इतिवृत्तास मंजुरी या विषयावरून बुधवारी येथे झालेल्या द्विवार्षकि संयुक्त सर्वसाधारण सभेमध्ये दोन गटात धक्काबुक्की झाली. दोन्ही गटाचे सदस्य एकाच वेळी बोलू लागल्याने सभेचा आखाडा बनला. या गोंधळातच सभाध्यक्ष विजय पाटकर यांनी सर्व विषय मंजूर झाल्याची आणि महामंडळाची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याची घोषणा करून सभा गुंडाळली. त्यानंतरही विरोधी गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याने पाटकर यांना बंद खोलीत बसून राहावे लागले.

गेले काही दिवस महामंडळात कुरघोडी सुरू असल्याने बुधवारची सभा गाजणार अशी चिन्हे होतीच. सभा सुरू होताच माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्याकडील १३ लाखांची देय रक्कम वसूल केल्याचे जाहीर झाल्याशिवाय सभा सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला. त्यातून दोन गटामध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी होत राहिल्या.

अशातच सुर्वे यांनी आपल्याकडील देय रकमेबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्याने ती देऊ शकत नाही, असा खुलासा केल्याने विरोधकांनी अकांडतांडव सुरू केले. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, दिग्दर्शक यशवंत भालकर, रणजित जाधव आदींनी आक्रमक भूमिका घेऊन सुर्वे यांना लक्ष्य केले. सभेतील वाद संपावा या हेतूने महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सुर्वे यांच्याकडील  रकमेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे, असे नमूद करून त्यांच्याकडील रकमेची भरपाई म्हणून एखादा कार्यक्रम आयोजित करून निधी संकलन करू, अशी सामंजस्याची भूमिका मांडली.  मात्र त्यालाही विरोध करत विरोधकांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवले. वाद इतका विकोपाला गेला, की  सदस्य एकमेकाला भिडले.  त्यातून धक्काबुक्की सुरू झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाना बाजूला केले.

‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमासाठी प्रसाद सुर्वे यांनी केलेला खर्च वैध आहे. आजची सभा घटनेप्रमाणे सुरळीत पार पडली आहे. ती गुंडाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

विजय पाटकर, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ

‘मानाचा मुजरा’साठी झालेल्या खर्चापोटी १३ लाख रुपये देण्याचे सुर्वे यांनी कबूल केले. ती रक्कम भरावी अशी मागणी आम्ही केली. पण, त्यावर चर्चा न करता सभा गुंडाळणाऱ्या पाटकरांशी संघर्ष कायम राहील.

रणजित जाधव, सदस्य