22 February 2019

News Flash

बनावट सोने तारण ठेवून ४० लाखांची फसवणूक

नऊ जणांच्या टोळीला अटक

( संग्रहीत छायाचित्र )

नऊ जणांच्या टोळीला अटक

विविध वित्तीय संस्था आणि चार सराफांकडे बनावट सोने तारण ठेवून तब्बल ४०  लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार येथे गुरुवारी उघडकीस आला आहे. नऊ जणांच्या  टोळीला याप्रकरणी पोलिसांनी अटक  केली असून त्यांच्याकडून २ किलो बनावट सोने जप्त केले आहे, ही माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. ३१ सोनसाखळ्या, ३ अंगठय़ा आणि १ कानातील जोडी असा हा मुद्देमाल आहे.

याप्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रकांत शिवराम भिंगार्डे, अतुल निवृत्ती माने,  विलास अर्जुन यादव, अमर दिनकर पाटील, भारती श्रीकांत जाधव, कविता आनंदराव राक्षे, विक्रम मधुकर कोईगडे,  राकेश रजनिकांत रणदिवे, पृथ्वीराज प्रकाश गवळी यांना अटक करण्यात आली आहे. तानाजी केरबा माने फरारी आहेत. सोनसाखळी, बांगडय़ा या आतील बाजूला अन्य धातूच्या तयार करून त्यावर जाडसर असा सोन्याचा मुलामा दिला जात असे. हे  बनावट दागिने तारण ठेवून चाळीस लाख रुपये कर्जाऊ  घेण्यात आले होते.

यांना फटका

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखा शिरोली दुमाला व कसबा बीड शाखा, (३०७ ग्रॅम सोने ५ लाख पन्नास हजार), आयसीआयसीआ़ बँक शाखा कोतोली, बाजार भोगाव, घोटवडे ( ७९३ ग्रॅम, १४ लाख ४३ हजार), वीरशैव बँक (२२७ ग्रॅम, ४ लाख ७ हजार) दर्शन सहकारी पतसंस्था ( ३५२ ग्रॅम,  ७ लाख ६७ हजार) राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक कागल (३०० ग्रॅम, ६ लाख) तसेच भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स पाचगाव (९३ ग्रॅम, १ लाख ४० हजार)  शंकर गणपतराव शेळके माळयाची शिरोली (७ ग्रॅम, १२ हजार), महालक्ष्मी ज्वेलर्स, बालिंगा (११ ग्रॅम, १८ हजार) असे एकूण दोन किलो वजनाचे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांच्याकडून ३९ लाख ३१ हजार रुपये  फसवणूक केलेली आहे. याबाबत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत

बँकांकडे सोने तारण ठेवण्यापूर्वी बँकेच्या सोनाराकडून सोन्याची गुणवत्ता तपासून त्याचे मूल्यांकन केले जाते. मात्र या प्रकारात सोने बनावट असून देखील संबंधित बँकेच्या सोनाराने ते अस्सल असल्याचे सांगतले. त्यामुळे  मोठी फसवणूक झाली. या पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा, शाखेतही असाच प्रकार झाला होता. तेव्हा बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह संबंधित सोनारालाही आरोपी करण्यात आले होते. मात्र यामध्ये बँकांच्या सोनाराला मोकळे सोडल्याची चर्चा आहे.

First Published on October 12, 2018 12:56 am

Web Title: financial scam in kolhapur