कोल्हापूर जिल्हा रुग्णालय सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय) येथील ट्रामा केअर विभागामध्ये आज पहाटे आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सूत्रांनी सांगितले. या वार्डमध्ये १६ रुग्ण होते. त्यांना तातडीने इतरत्र हलविण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वैद्यकिय तसेच अन्य साहित्याचे काही प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.

कोल्हापूरचा थोरला दवाखाना अशी सीपीआरची ओळख आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरत आहे. या रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर मध्ये पहाटे आग लागली. त्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल करून तेथील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवले. या वार्डमध्ये सोळा रुग्ण होते, असे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी सांगितले.

ही आग शॉर्टसर्किटने लागली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. सीपीआर हे करोना रुग्णालय असल्याने आणि तेथे आग लागली असल्याचे समजल्याने हा गंभीर प्रसंग ओळखून जिल्हाधिकारी देसाई हे सायकलवरून रुग्णालयात दाखल झाले.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आग लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यामध्ये जीवित वा अन्य प्रकारची मोठी हानी झाली नसल्याचे समजल्याने नागरिकांनी निश्वास टाकला.