समाजातील सद्य:स्थिती, इतिहास, पौराणिक कालावधी, विज्ञान अशा विविध विषयांना स्पर्श करणारे देखावे खुले झाल्याने करवीरनगरीतील रस्त्यावर गर्दी वाढू लागली आहे. देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राजारामपुरी, शिवाजी चौक तसेच अन्य ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.  घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यावर  बहुतेक सर्व मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. बाप्पाना निरोप देऊन भाविकांनी देखावे पाहण्यासाठी फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक नागरिक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडल्याने सायंकाळनंतर शहरातील रस्ते नागरिकांनी फुलून गेले. शिवाजी चौकातील महागणपतीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती.  स्वयंभू तरुण मंडळाचा श्रावणबाळ देखावा चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे. शाहूपुरीतील शिवतेज मित्र मंडळाने उभारलेला चिनी पद्धतीचा गणेश मंदिराचा देखावा आकर्षणिबदू ठरला आहे.  राजारामपुरीत न्यू गणेश मंडळाचा डायनासोरचा देखावा बाळगोपाळांना खिळवून ठेवत आहे.  मित्रप्रेम मंडळाच्या शिरस्ता शिवशाहीचा हा सजीव देखावा, रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळाने दख्खनचा राजा दरबारच्या ठिकाणी गर्दी होती. टेंबे रोडवरील जादू ग्रुपने थायलंड येथील सुवर्णभूम विमानतळावरील समुद्रमंथनाची ४४ फूट लांब साकारलेल्या गणेशमूर्तीसोबत अनेकांनी ‘सेल्फी’ काढला.  उद्यमनगर येथील मदनलाल िधग्रा तरुण मंडळाचा ‘पोकोमॉनमधील पिकाच्चू मोबाइल गेम’ देखावा, शाहूपुरी चौथ्या गल्लीतील शाहूपुरी युवक मंडळाचा ‘वारी पंढरीची, परंपरा महाराष्ट्राची’ तांत्रिक देखावा, शाहूपुरी चौथ्या गल्लीतील गणेश तरुण मंडळाचा ‘नॉडी कार्टून’चा तांत्रिक देखावा, रविवार पेठेतील पॉलिटिक्स ग्रुपप्रणीत श्री गणेश स्वराज्य व्यापार मित्र मंडळाचा ‘गुहेतील गणेशस्नान’ देखावा, राजारामपुरी चौथ्या गल्लीतील ‘राधाकृष्णाची रासलीला’ हा तांत्रिक देखावा, सहाव्या गल्लीतील ‘मुंबई बॉम्बस्फोट’ देखाव्याचा समावेश आहे.