ज्या कोल्हापुरात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे धडे दिले, त्याच भागातील शेतकऱ्यांना ऊस, दुधासह शेतीमालाचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार कसा करावा याबाबत सुज्ञ करण्याचे श्रेय शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या खात्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी औरंगाबाद येथे उपोषणाला जोशी बसल्याचे पाहून साखर पट्टय़ातील शेतकऱ्यांना आपल्या प्रश्नासाठी विदर्भ-मराठवाडय़ातून कोणीतरी आवाज उठवितो आहे, हे पाहून रस्त्यावर येऊन लढण्याची प्रेरणा देण्याचे कामही त्यांनीच केले. किंबहुना या प्रेरणेतून खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, जयपाल फराटे यासह पश्चिम महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील शेतकरी नेतृत्व उदयास येऊन शासन आणि साखर कारखानदारांना जेरीला आणण्याच्या आंदोलनाची धग निर्माण झाली.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांची शनिवारी सकाळी प्राणज्योत मालवली. योध्दा शेतकऱ्याच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्टय़ातील शेतकऱ्यांचे डोळे आसवांनी भरुन गेले. या भिजल्या नेत्रांमध्ये शरद जोशींनी लढण्याचे जे सामथ्र्य दिले त्याचा पट उलगडत गेला.
खरे तर जोशी यांचे करिअर करवीर नगरीतच आकाराला आले. येथील कॉमर्स महाविद्यालयात १९५७ साली त्यांनी अर्थशास्त्र व संख्याशास्त्राचे व्याख्याते म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा मूलमंत्र देणाऱ्या या प्राध्यापकास पुढे याच भागातील बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांना शेतीमालाचे अर्थशास्त्र शिकवण्याचे अमोल काम करावे लागले. जोशी यांची शेतकरी चळवळ विदर्भ-मराठवाडय़ात आकाराला आली. त्यांचा लढाऊ बाणा पाहून पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांची एक पिढी आकर्षति झाली. तीही आपल्या गावी आवाज उठवू लागली. पण आवाज मात्र क्षीण होता. कारण या भागातील काँग्रेसचे नेतृत्व आपण शेतकऱ्यांचे नेते असल्याचे सांगत होते. येथील धरणे, साखर कारखाने, सहकारी संस्था, तेथील नोकऱ्या या आपणच उभ्या केल्याच्या त्यांच्या दाव्यामुळे शेतकरीही दबून जात. पण याच भागात शरद जोशी यांनी पाय रोवत शेतीमालासाठी लढण्याचा मूलमंत्र दिला. खेडोपाडय़ात शेतकरी संघटनेचा विचार मांडण्यासाठी तरुणांची फौज जात असे. पण त्यांना सभा-बठकीसाठी ना कोणी जागा देत, ना ध्वनीयंत्रणा. राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्ताने जोशी एका खेडय़ात पोहोचले तेंव्हा अवघी २० माणसे असतानाही त्यांनी दीड-दोन तास भाषण केले. इतका वेळ का बोललात, या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत- ‘मी विचारांचे बी पेरतोय, उद्या ते उगवणार आहे’. आणि त्यांचा तो आत्मविश्वास दोन दशकाच्या संघर्षांनंतर पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्टय़ात पहायला मिळाला.
जोशी यांच्या औरंगाबाद येथील अधिवेशनापासून प्रभावित झालेल्या शेट्टी, रघुनाथदादा, सदाभाऊ खोत या नव्या दमाच्या फळीने पश्चिम महाराष्ट्र आंदोलनाने पेटवून ठेवला. परिणामी उसाला प्रतिटन पाचशे रुपये मिळणारा भाव दशकभरात अडीच हजाराची सीमा ओलांडून पुढे गेला. गावगाडय़ातील अडाणी माणूस रस्त्यावर उतरुन आंदोलन करतानाच अर्थशास्त्रीय मांडणी करुन राज्यकर्त्यांच्या नजरेला नजर देवून प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवू लागला. ताठ मानेने तुरुंगात जाणारा बळीराजा निधडय़ा छातीवर गोळ्या झेलण्यास शिकला. शिवरायानंतर बहुजन समाज जीव ओवाळून टाकू लागला, तो जोशींच्या विचाराने, असे सदाभाऊ सांगतात.
वाजपेयी शासनाने जोशींची टास्कफोर्सच्या अध्यक्षपदी निवड केली. तेंव्हा मिरजेत आल्यानंतर जोशी यांनी मी अध्यक्ष असलो तरी तुम्ही चळवळ नेटाने सुरु ठेवली तर सरकारवर दबाव येऊन माझा अहवाल स्वीकारला जाईल, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना सत्तेविरोधातही लढण्याचे बळ दिले. शेतकऱ्याचे मरण सरकारी धोरणात असल्याचा विचार त्यांनी मांडला. जोशी यांच्या निधनाने शेतकरी नेते व कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात अश्रू असले तरी दुसऱ्या डोळ्यात लढण्याचा ‘अंगारमळा’ फुलतो आहे.