|| दयानंद लिपारे

अध्यक्षपदाची आज निवड

कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघात सत्तांतर घडवून आणल्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे हाती सोपविण्याचा आजचा दिवस. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याचे कुतूहल असताना संघाच्या कारभाराची दिशा कशी राहणार याच्या धोरणात्मक वाटचालीविषयी कुतूहल आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव संचालक मंडळावर राहणार आहे. प्रत्येक तालुक्यातील इच्छुकांची रांग पाहता स्वीकृत, शासननियुक्त संचालक निवडीतही विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ५८ वर्षांच्या वाटचालीत मे महिना विलक्षण उलथापालथ घडवणारा ठरला. गेली ३० वर्षे सत्ता भोगणाऱ्या सत्ताधारी गटाला हटवून तेथे विरोधी गटाने निशाण रोवले. सत्तांतराचा संघर्ष जितका रोचक ठरला तितकेच संघाच्या आगामी कारभाराविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत.

अध्यक्षांना जबाबदारीचे भान

निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी दूध दर वाढवून देण्याचे आश्वाासन दिले असल्याने पहिला निर्णय याबाबतचा अपेक्षित असणे स्वाभाविक आहे. याचबरोबर गोकुळला ‘अमूल’ दूध संघाच्या बरोबरीने देण्याचा विचार नेत्यांनी बोलून दाखवलेला आहे. हे आव्हान पेलण्यासाठी जबाबदारीचे भान असलेला खांदाही तितकाच सक्षम अपेक्षित आहे. यासाठी अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याविषयी हे महत्त्वाचे आहे. विश्वास पाटील, अरुण डोंगळे या माजी अध्यक्षांची नावे अग्रस्थानी आहेत. त्यापैकी पहिल्यांदा खुर्चीत कोण बसणार हे आज स्पष्ट होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नव्या सत्ताधाऱ्यांच्या कामकाज पद्धतीचे, धोरणाचे दिशादर्शन होणार आहे. ते कसे असणार हे उल्लेखनीय असल्याने अध्यक्ष निवडीचा दिवस भव्य स्वप्ने बाळगताना बाळगणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी वाटचालीसाठी विशेष ठरणार आहे. तर, पुढील पाच वर्षांत गोकुळची नौका कोणत्या दिशेने न्यायची यावर दोन्ही मंत्र्यांचा प्रभाव राहणार आहे. त्यांना संचालकांना मार्गदर्शन करताना काही जबाबदारीची जाणीवही करून दिली पाहिजे. याला कारण गोकुळची पहिली बैठक हे चर्चेचे कारण ठरले आहे.

निर्णयावरून संदिग्धता

गोकुळमध्ये सत्तापालटानंतर आगामी वाटचाल या विषयीचे निवेदन पाहता आशावाद वाढीस लागला आहे. विकासातील अडसर दूर करणे, नवी व्यावसायिक नीती आणि नीतिमत्ता याचे विवेचन करण्यात आले. नवीन वाट धुंडाळताना निर्णय जाहीर करण्याचा नवा शिरस्ता कितपत रास्त ठरणार याची चर्चा होत आहे. नवनिर्वाचित संचालकांनी पहिल्यावहिल्या बैठकीत ‘‘गैरहजर राहून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही. आम्ही गोकुळ दूध संघाचे संचालक झालो आहोत, मालक नव्हे. संचालक म्हणून चैनी करणे नीतिमत्तेत बसत नाही. मोठ्या हॉटेलमधील खाते बंद करा. हारतुरे, पुष्पगुच्छ, पाण्याच्या बाटल्याना पायबंद घाला,’ अशी सूचना संचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या. हे निर्णय गोकुळच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या पद्धती दूर होण्याबरोबर दीर्घकालीन धोरण संघाला सक्षम करणारे आहे. पण या निर्णयावरून चर्चा होत आहे. संचालकांनी ‘बैठकीनंतर केवळ औपचारिक भेट, अधिकाऱ्यांशी ओळख यापलीकडे काहीच झाले नाही. अध्यक्ष निवड झाल्यानंतर कामकाजाबाबत धोरण स्पष्ट करण्यात येईल’ असे सांगितले. मात्र, प्रसिद्धी पत्रकातून उपरोक्त धडाकेबाज निर्णयाची माहिती नवीद मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आली. अशा पद्धतीच्या निर्णयावरून अन्य संचालक आता हात वर करीत आहेत. अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे पहिल्या बैठकीत नेमका निर्णय खरेच झाला की केवळ पत्रकातून निर्णय घेतला याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. जुन्या, अनुभवी