03 December 2020

News Flash

कॉ. पानसरे खूनखटल्याची आज सुनावणी

सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येत नाही

सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येत नाही. यासाठी पोलीस वेगवेगळी कारणे देत आहेत. तावडे याला कोल्हापूर येथे उपस्थित न करून चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. कॉ. पानसरे खूनखटल्याच्या प्रकरणात सुनावणीच्या वेळी डॉ. तावडे याला उपस्थित न केल्याने वकील म्हणून माझीही त्याच्याशी भेट होऊ शकलेली नाही. ही एकप्रकारे पोलिसांनी डॉ. तावडे याच्या न्याय्य अधिकारावर आणलेली गदाच आहे, याची गंभीर दखल न्यायालयाने घ्यावी, असे मत वीरेंद्रसिंह तावडे याचे वकील अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

कॉ. पानसरे खूनखटल्याच्या प्रकरणाची उद्या (सोमवारी) सुनावणी आहे. गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांची वेळकाढूपणाची भूमिका पाहता सोमवारी पोलीस डॉ. तावडे याला  न्यायालयात उपस्थित करणार का, यावर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे, असे नमूद करून पटवर्धन म्हणाले, गतवेळची सुनावणी २१ जानेवारी या दिवशी झाली. त्या वेळी न्यायालयाचे आदेश असतानाही डॉ. तावडे याला उपस्थित करण्यात आले नव्हते. त्या सुनावणीत तपास अधिकारीही न्यायालयात उपस्थित नव्हते आणि सरकारी वकील कोणतेही समाधानकारक उत्तरही न्यायालयास देऊ शकले नाहीत. यामागे हा खटला लांबवण्याचा पोलिसांचा डाव असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड यालाही पोलिसांनी न्यायालयात उपस्थित करण्यास नेहमीच विलंब केला. ९ ऑक्टोबर २०१५ या दिवशी समीरचे ‘ब्रेनमॅिपग’चे आवेदन फेटाळल्यानंतर खटला लांबवण्याच्या उद्देशाने  समीर याला दोन महिने न्यायालयातच उपस्थित करण्यात आले नाही. गणेशोत्सव, निवडणुका, हाय प्रोफाईल कैदी, अपुरे मनुष्यबळ, अशी वेगवेगळी कारणे देत पोलीस समीरची न्यायालयातील उपस्थिती टाळत होते. अखेर एक महिन्याच्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर २१ नोव्हेंबर या दिवशी त्याला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली. यानंतर डिसेंबर २०१५ पासून त्याला परत न्यायालयात उपस्थित करण्यात येऊ लागले. यानंतर मार्च-एप्रिल २०१६ मध्येही अशाच प्रकारे विविध कारणे देत पोलीस त्याला  न्यायालयात उपस्थित करण्याचे टाळत होते. असाच प्रकार पोलीस आता तावडेच्या बाबतीत करत आहेत, असे पटवर्धन यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 1:01 am

Web Title: govind pansare murder case hearing today
Next Stories
1 कोल्हापुरात खासदारांमध्ये लोहमार्गावरून श्रेयवाद
2 भाजपा-स्वाभिमानी स्वबळावर
3 पवार यांच्या विधानांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
Just Now!
X