बिहार विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन रविवारी जनता दलासह पुरोगामी पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला होता. काँग्रेस पक्षाची स्थिती सुधारल्याने फटाके उडवून व साखर वाटप करुन जल्लोष करण्यात आला. समाज माध्यमांतून प्रधानमंत्री व भाजप पक्षाध्यक्षांची खिल्ली उडवणारे संदेश दिवसभर फिरत होते.
बिहार राज्यातील निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते. सकाळी पहिल्या टप्प्यात भाजपाच्या बाजूने कौल, पण दोन तासानंतर चित्र पालटून भाजपाची पीछेहाट आणि जनता दल, काँग्रेसची घोडदौड सुरु झाल्याने वातावरण बदलले. भाजपाच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांची गर्दी कमी झाली.
शहर व जिल्ह्यात नितीशकुमार, लालूप्रसाद यांना मानणारा जनता दलाचा वर्ग कमी असला तरी देवेगौडा यांना मानणारा धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) जनता दलाची स्थिती बऱ्यापकी आहे. समानधर्मी जनता दल पुनश्च सत्तेत आल्याने जनता दलाच्या कार्यकर्त्यांना कित्येक वर्षांनंतर आनंद व्यक्त करण्याची संधी मिळाली. जनता दलाचे प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी नरेंद्र मोदींचा वारु रोखल्याबद्दल नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांचे अभिनंदन करतानाच भाजपच्या जातीय राजकारणाला जनता दल परिवार पर्याय ठरु शकतो हे या निवडणुकीतून सिध्द झाल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाची स्थिती ४ वरुन २४ वर गेल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजच दिवाळी साजरी केली. इचलकरंजी येथे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत भोसले, राजू बोंद्रे, भारत बोंगार्डे यांच्या नेतृत्वाखाली मलाबादे चौकात फटाक्यांची आतषबाजी करुन साखर वाटप करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी बिहारचा निकाल म्हणजे समस्त भारतीयांचा कौल असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, दादरी प्रकरण, दलित हत्याकांड, भागवतांचे आरक्षणविषयी विचार, महागाई या मुद्द्यांमुळे वैतागलेल्या बिहारच्या जनतेने मोदी-शहा यांना नाकारले आहे. बिहारपासून क्रांतीची सुरुवात होते हे आजपर्यंत दिसून आले असून तोच कित्ता पुढेही सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपा नेते सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनतेचा कौल मान्य केल्याचे सांगितले. ते म्हणाले, पारदर्शक कारभार करणारा भाजप आपल्या मुळावर येणार हे ओळखून सर्व विरोधक एकवटले होते. त्यांनी संयुक्तरित्या भाजपाला लक्ष्य केल्याने आम्ही कमी पडलो.