अवकाळी पावसाने कोल्हापूर शहराला बुधवारी सायंकाळी झोडपून काढले. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पारा तापला होता. दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी कोल्हापूर शहरात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अर्धा तास झोडपून काढले. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोप गावातील पेट्रोल पंप जमीनदोस्त झाला. शाळा, घरे, कारखाने यांचे पत्रे उडून गेले. कलिंगड, काजू, आंबा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

एकीकडे ताळेबंदीमुळे शेतकऱ्यांची भाजीपाल्याची पिके शेतातच उभी आहेत. त्यातच सततच्या वळवाच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा पुन्हा संकटात सापडत आहे. दुसरीकडे उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र आता दिलासा मिळाला आहे. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.