घटस्फोट प्रकरणात समेट घडवून आणण्याच्या नावाखाली २५ लाख रुपयांच्या खंडणी वसुलीसाठी बेदम मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील शहापूर पोलिसात १२ जणांच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नरेंद्र सुरेश भोरे याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ऋषिकेश दिगंबर शिंदे (२८), इम्रान दस्तगीर कलावंत (२९) अरिफ दस्तगीर कलावंत (३०) व संदेश विलास कापसे (२०) यांना अटक केली आली. या चौघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता २० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी नरेंद्र भोरे व त्याची पत्नी यांच्यात घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या घटस्फोट प्रकरणात समेट घडवून आणण्याच्या नावाखाली २५ लाख रुपये खंडणी उकळण्याच्या उद्देशाने ६ जुलै २०१७ रोजी भोरे यांना उपरोक्त संशयितांनी लोखंडी सळी व काठ्यांच्या सहाय्याने जबर मारहाण करुन जखमी केले.

तसेच घरात घुसून साहित्याचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. त्यानंतर फेब्रुवारी अखेर खंडणी वसुलीसाठी वेळोवेळी भोरे यांच्या घरात व गावभागातील औषध दुकानात घुसून दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत दुकानातील साहित्य जबरदस्तीने घेऊन गेले. त्यामध्ये घड्याळ, गॉगल व कॉस्मेटीक साहित्य असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.