नोटा रद्द केल्यानंतर सोन्याची चढय़ा दराने विक्री

हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर रविवारी शहरातील अनेक सराफी व्यापाऱ्यांच्या पेढीवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. सोन्याची चढ्या दराने विक्री सुरु असल्याचा जोरदार बोलबाला झाल्याने या धाडी पडल्या असल्याचे सांगण्यात येते. नामांकित पेढ्यांवर अचानक छापे पडल्यामुळे व्यापारीवर्गात एकच खळबळ उडाली.  हा प्रकार पाहून अनेक सराफ व्यापाऱ्यांनी आज  आपली दुकाने बंद ठेवली. आधी सराफ व्यावसायिकांनी मंगळवापर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण नंतर तो मागे घेण्यात आला. हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांवर छापे मारण्यास सुरुवात केली आहे . यात आता कोल्हापूरची भर पडली आहे. नोटा बदलण्याचा निर्णय झाल्याने  येथील काही बड्या सराफांनी चांगलेच हात धुवून घेतले. जुन्या नोटांच्या बदल्यात सोने अव्वाच्या सव्वा किमतीला सोने विकण्यास सुरुवात केली.

तोळ्याचा दर काहींनी लाखाच्या पुढे नेल्याची चर्चा गुजरीत ऐकायला मिळू लागली. सोन्याचा दर वधारल्याने विक्रीसाठी आलेल्यांना  १५ दिवसांनी पसे देणार असल्याचे सांगून त्यातही सराफांनी आपली चांदी  करून घेतली. या प्रकारची जोरदार चर्चा होऊ लागली. ती प्राप्तिकर  विभागापर्यंत पोहोचली. त्यातून आजच्या धाडी पडल्याचे सांगितले जाते. कर चुकवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.  बड्या सराफांच्या पेढीवर धाडी पडल्याचे कळताच व्यापाऱ्यांत घबराट पसरली. अनेक सराफ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सूत्रांकडून समजले, की शहरातील अनेक सराफ व्यापारी, उद्योगपती, डॉक्टर्स, वकील तसेच अनेक प्रतिष्ठित राजकीय पुढारी योग्य पध्दतीने प्राप्तिकर भरत नाहीत. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते. याची दखल घेत पाच ते सहा वाहनांमध्ये आलेल्या पथकांनी एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. कर बुडवणाऱ्या अनेक नामवंतांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या छापा सत्रामुळे व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.