पश्चिम महाराष्ट्रातील  मोठा मटका बुकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीष अग्रवाल याच्या मटका बुकीवर शनिवारी रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने छापा मारला. यामध्ये बुकी मालक अग्रवाल यांच्यासह मोबाइलवरून मटका घेणाऱ्या नऊ  जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३४  मोबाइल व २६  हजार आठशे रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला. या प्रकरणी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवर असलेल्या लांडे हॉस्पिटल जवळ मटका घेतला जात असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाला समजली. त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता या बुकीवर छापा टाकला. त्या वेळी तेथे मोबाइलवरून मटका घेणारे नऊ जण रंगेहाथ सापडले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून ३४  मोबाइल, मटक्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणी अजित बाळासो पाटील (वय ३८, रा. गणपती कट्टा जवळ), पद्मज सुरेश कोवडे (३६ , सूर्योदय नगर), सुनील मारुती भिंगे (२७), परशुराम मारुती दौडमणी (३३, दोघे रा. गणपती कट्टा), सागर चंद्रकांत सुतके (२५, केटकाळे गल्ली), दीपक विठ्ठल मुदगल (३८, अवधूत आखाडा), दत्तात्रेय महादेव डांगे (३५, आर. के. नगर) रवींद्र प्रकाश माने (३७, गणपती कट्टा) यांना अटक केली.  या कारवाईनंतर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. या बुकीला व्हाइट कॉलर नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चा सुरू होती.