कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत दौलत सहकारी साखर कारखाना विकत घेणाऱ्या न्यूट्रीयन्स साखर कारखाना संदर्भातील विविध प्रश्नांवरून गोंधळ उडाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंदगडचे नेते प्रा. राजेंद्र गड्डेण्णावर यांना बोलण्यापासून रोखत धक्काबुक्की करण्यात आली. दौलत कारखान्याच्या विक्रीची दहा वेळा निविदा काढूनही प्रतिसाद आला नसल्याने ‘न्यूट्रीयन्स’ला रास्त भावामध्ये दौलत कारखाना देण्यात आला आहे. हा कारखाना शेतकरी व कामगारांची देणी भागविल्याशिवाय चालू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी या वेळी दिली.

बँकेची निवडणूक झाल्यानंतर पहिलेच वर्ष पूर्ण झाल्यानंतरची ही पहिलीच सभा होती. सभेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी कामगिरीचा आढावा घेतला. कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

यानंतर सभासद संस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सुरुवात झाली. यापकी ‘न्यूट्रीयन्स’ कंपनीचा विषय वादग्रस्त ठरला. ‘दौलत’चे माजी अध्यक्ष नरसिंग पाटील यांचे पुत्र राजेश, गोपाळराव पाटील व गड्डेण्णावर यांनी विविध प्रश्नांच्या फैरी सुरू केल्या. राजेश पाटील यांनी फेरनिविदा काढण्याची मागणी केली, पण मुश्रीफ यांनी आता ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. गड्डेण्णावर यांनी बँकेच्या संचालक मंडळाने ‘दौलत’बाबत घेतलेल्या भूमिकेवरून जोरदार टीका केली. त्यावर मुश्रीफ यांनी दौलत कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार असे सारेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तालुक्यातील ऊस गाळपासाठी जात आहे यात आनंद आहे की, कारखाना बंद ठेवण्यात आहे असा सवाल केला.

यानंतरही गड्डेण्णावर यांनी आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. त्यास आक्षेप घेत बँकेने निविदा काढली तेव्हा स्वाभिमानी संघटना निद्रिस्त होती का, असे म्हणत त्यांना बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अनेकजण ध्वनिक्षेपकाकडे येऊन एकाचवेळी बोलू लागल्याने सभेत गोंधळ उडाला. यातच गड्डेण्णावर यांना धक्काबुक्की करण्यात आली. हा गोंधळ बराच काळ सुरू होता. मुश्रीफ यांनी दौलत-न्यूट्रीयन्सच्या भूमिकेत बदल होणार नाही असे सांगितल्यावर वादावर पडदा पडला.